केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांमध्ये ‘राज्यगीत’ सक्तीचे..!!


मुंबई : राज्याचा अलौकिक असा इतिहास विद्यार्थ्यांना कळावा यासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी राज्यातील शाळांमध्ये राज्यगीत सुरु करण्याची सक्ती केली होती. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आता केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांमधेही राज्यगीत सक्तीचे करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने नव्याने पत्रक काढत सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये राज्यगीत वाजलेच पाहिजे, असे सक्तीचे निर्देश दिले आहेत. त्याबाबत विभागीय उपसंचालकांना करडी नजर ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ‘काळ्या छातीवरी कोरली,

“अभिमानाची लेणी… पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी,’ अशा सार्थ ओळीत राज्यातील माणसांचे वर्णन करणारे, ‘भीती न आम्हा तुझी मुळी ही, गडगडणाऱ्या नभा,’ असे म्हणत महाराष्ट्राच्या निर्भिड वृत्तीचे दर्शन घडवणारे गीतकार राजा बढे यांच्या लेखणीतून उतरलेले आणि श्रीनिवास खळे यांच्या संगीताने नटलेले हे गीत शाहीर साबळे यांनी बुलंद आवाजात गायले हे गीत राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आले.

गेल्या वर्षी तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी हे गीत शाळांमध्ये वाजवण्याची सक्ती केली. यंदा शालेय शिक्षणमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, दादाजी भुसे यांनी या निर्णयाची व्याप्ती वाढवत हे गीत केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंडळाच्या शाळांमध्येही वाजवणे अनिवार्य केले.आता हे गीत शाळा भरताना राष्ट्रगीतानंतर वाजवले जावे, यासाठी पुन्हा शालेय शिक्षण विभागाने आग्रह धरला आहे. त्यासाठी राज्याचे शिक्षण सहसंचालक (प्राथमिक) रमाकांत काठमोरे यांनी निर्देश दिले आहेत.

Advertisement

याच्या अंमलबजावणीची जबाबदारी विभागीय शिक्षण उपसंचालकांवर सोपवली आहे. शासन निर्णयानुसार, सर्व शाळांचे दैनिक सत्र सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत, परिपाठ, प्रार्थना आणि प्रतिज्ञा यांच्यासोबत राज्यगीत गायले जाणे आवश्यक आहे. या पूर्वी वेळोवेळी सर्वच शाळांना याबाबत सूचित करण्यात आले आहे. तसेच विभागीय उपसंचालकांना या निर्णयाबाबतचा अहवाल शिक्षण संचालनालयाकडे पाठवण्यास सांगितले होते. हा अहवाल अद्यापही प्राप्त झाला नसल्याचे निरीक्षण काठमोरे यांनी या निर्देशांमध्ये नोंदवलेआहे.

आता विभागीय उपसंचालकांनी हे निर्देश गांभीर्याने घेत प्रत्येक शाळेत राज्यगीत वाजवले जाते अथवा नाही, याचा जिल्हानिहाय अहवाल तातडीने सादर करावे, असे राज्याचे शिक्षण सहसंचालक (प्राथमिक) रमाकांत काठमोरे यांनी सूचित केले आहे. त्यामुळे आता प्रत्येक शाळेत राज्यगीत वाजते अथवा नाही, याची तपासणी होणार आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x