संघर्षाला राज ठाकरेंची साथ; ‘शिवतीर्थ’वर पोहोचली डोंबिवलीची शोरमा गर्ल..!!
डोंबिवली/मुंबई : निर्भीड समाचार News Desk
सोशल मीडियावर ‘शॉरमा गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झालेली डोंबिवलीतील मराठी उद्योजिका एकता सावंत हिने ५ मार्च २०२६ रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. आपल्या संघर्षाच्या काळात खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिलेल्या राज ठाकरे आणि मनसेचे आभार मानण्यासाठी ती मुंबईत आली होती.
डोंबिवली रेल्वे स्टेशनबाहेर एकता सावंत आपला शॉरमा स्टॉल चालवत होती. मात्र, काही दिवसांपूर्वी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) केवळ तिच्याच स्टॉलवर कारवाई करून तो जप्त केला होता. इतर परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याने एकताने सोशल मीडियावर रडत आपली व्यथा मांडली होती. तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन मनसे नेते अविनाश जाधव यांना मदतीच्या सूचना दिल्या होत्या.
राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेने पुढाकार घेऊन एकताला राज ठाकरेंचा फोटो असलेला नवा कोरा शॉरमा स्टॉल मिळवून दिला. या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकताने राज ठाकरेंची भेट घेतली.या भेटीदरम्यान एकताने राज ठाकरे यांच्यासाठी एक खास घड्याळ भेट म्हणून नेले होते. यावर राज ठाकरेंनी ती भेट स्वीकारण्यास प्रेमाने नकार दिला आणि हसून तिला सांगितले, “मला घड्याळ नको, तू मला मस्तपैकी शोरमा घेऊन ये”. त्यांनी तिला हिंमत न हारता आपला व्यवसाय मोठा करण्याचा आशीर्वाद दिला. एकताने यावेळी सौ. शर्मिला ठाकरे यांचीही भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.
अविनाश जाधव यांच्या हस्ते एकताच्या नव्या स्टॉलचे उद्घाटन आधीच करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या भेटीचा व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, एका मराठी उद्योजिकेच्या पाठीशी राज ठाकरे उभे राहिल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. सध्या एकता पुन्हा एकदा नव्या जोमाने डोंबिवलीत आपला व्यवसाय सांभाळत आहे.





