संभाजीनगरमध्ये पावणेतीन कोटींचे भेसळयुक्त तेल जप्त; २ कारखाने सील!
मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा
अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छत्रपती संभाजीनगर आणि पैठण परिसरात एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये तब्बल २ कोटी ९३ लाख ३५ हजार ६०३ रुपये किमतीचा संशयास्पद आणि निकृष्ट दर्जाचा १ लाख ९० हजार ६५५ किलो खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नामांकित ‘बागारिया’ समूहाचे दोन मोठे कारखाने तातडीने सील करण्यात आले असून त्यांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
गोपनीय माहितीच्या आधारे एकाच वेळी छापे: मिळालेल्या अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे, एफडीएच्या विशेष जिल्हा पथकाने शनिवार, ११ जुलै रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी गुप्त छापे टाकले. यामध्ये पैठण रोडवरील गेवराई तांडा येथील ‘मेसर्स बागारिया ॲग्रो प्रॉडक्ट्स’ (गट नं. ७२) आणि शहरातील अभिनय टॉकीजच्या मागे, लक्ष्मण चावडी भागात असलेल्या ‘मेसर्स बागारिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या दोन्ही ऑईल रिपॅकिंग युनिट्सचा समावेश आहे. सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलाबाबत चाललेला हा जीवघेणा खेळ पाहून स्वतः तपासणी अधिकारीही चक्रावून गेले.
कारखान्यातील धक्कादायक वास्तव आणि अस्वच्छता: एफडीएच्या तपासणीत या कारखान्यांमध्ये अन्न सुरक्षा कायद्याचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळले.
1. अस्वच्छता व गंजलेले डबे: उत्पादनासाठी अत्यंत घाणेरडे, गंजलेले आणि जुने टीन वापरले जात होते, तसेच रिफायनरी परिसरात धूळ आणि कोळी-काजळी साचलेली होती.
2. संक्रमीत तेलाचा धोका: उघड्या टबमध्ये साठवलेले दुर्गंधीयुक्त तेल आणि बंद रिफायनरी विभागामुळे ‘क्रॉस-कंटॅमिनेशन’चा मोठा धोका निर्माण झाला होता.
3. ओळख चिन्हांचा अभाव: तेलाच्या टाक्यांवर किंवा पाईपलाईनवर कोणतीही माहिती नमूद नव्हती.
गुणवत्ता नियंत्रणाचा अभाव: कारखान्यात तेलाची गुणवत्ता तपासण्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा, तांत्रिक तज्ज्ञ किंवा फूड ग्रेड प्रमाणपत्रांचा अभाव असल्याचे आढळून आले, ज्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
विविध प्रकारचे तेल जप्त, नमुने प्रयोगशाळेत: या कारवाईत रिफाइंड पाम तेल, सोयाबीन तेल, कपाशी तेल आणि इतर अज्ञात वनस्पती तेलाचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला आहे. हा साठा ताब्यात घेऊन तेलाचे नमुने तात्काळ राज्य मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत रासायनिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींवर अन्न सुरक्षा मानके कायदा, २००६ अंतर्गत कठोर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा सहाय्यक आयुक्तांनी दिला आहे. या कारवाईमुळे भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि तेल विक्री करणाऱ्या राज्यांमधील मोठ्या रॅकेटचे धाबे दणाणले आहेत.





