“बोरीवली-कांदिवलीतील हजारो कुटुंबांचा घराचा प्रश्न सुटणार; वनमंत्र्यांकडून विधानसभेत आश्वासन!”
मुंबई : निर्भीड समाचार News Desk
मुंबईतील बोरीवली आणि कांदिवली भागातील वन विभागाच्या जमिनीवर वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या निवासाचा प्रश्न आता लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंदखेड राजा, मेहकर, बुलढाण्यासह इतर भागांतील सुमारे २५ ते ३५ हजार नागरिक या झोपडपट्ट्यांमध्ये अनेक वर्षांपासून राहत आहेत. आज विधानसभेत आमदार सुनील प्रभू आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेत या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.
जानेवारी महिन्यात या भागाचा दौरा केला असता, स्थानिक नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घरासाठी विधानसभेत आवाज उठवण्याचा शब्द दिला होता. त्या वचनाची पूर्तता करत आज हा विषय लावून धरला. आमदार सुनील प्रभू यांनीही या प्रश्नाचे गांभीर्य मांडले. वनमंत्री गणेश नाईक यांनी यावर प्रतिसाद देताना एका निश्चित कालमर्यादेत (Time-bound period) हा प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, असे स्पष्ट केले. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अनिश्चिततेच्या सावटाखाली जगणाऱ्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.





