शिवराज्याभिषेक: दगडधोंड्यांच्या स्वराज्यात सुवर्णसिंहासन!
मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा
“इतिहासालाही भीती वाटण्यासारखं धाडस या मातीत घडलं, म्हणूनचं दगडधोंड्याच्या स्वराज्यात सुवर्णसिंहासन सजले..”
महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासातील ‘६ जून १६७४’ हा केवळ एक दिनांक नाही, तर तो एका नव्या कालखंडाचा, म्हणजेच ‘शिवशके’ या नव्या युगाचा प्रारंभ आहे. तीनशे वर्षांहून अधिक काळ ज्या मातीने केवळ परकीय आक्रमकांचे जुलूम, जहागीरदारीची गुलामगिरी आणि मंदिरांचे विनाशी थैमान पाहिले होते, त्याच मातीने रायगडाच्या छाताडावर एका रयतेच्या राजाचा सार्वभौम राज्याभिषेक सोहळा पाहिला. सह्याद्रीच्या दगडधोंड्यांमधून, रक्ताचे पाणी करून उभे राहिलेले स्वराज्य ६ जून रोजी कायदेशीर आणि सार्वभौम राजेशाहीत रूपांतरित झाले. हा सोहळा म्हणजे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐश्वर्य नव्हते, तर ती या मातीतील प्रत्येक दीन-दुबळ्या, कष्टकरी आणि मावळ्यांच्या स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याची राजमुद्रा होती.
राज्याभिषेकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि गरज
शिवाजी महाराजांनी तोरण बांधून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली तेव्हा त्यांच्याकडे ना मोठी संपत्ती होती, ना पूर्वजांचे मोठे राज्य. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. अफझलखानाचा वध, शाहिस्तेखानाची फजिती, आग्र्याहून सुटका आणि सुरतेची लूट यांसारख्या अचाट पराक्रमांनी विजापूरची आदिलशाही आणि दिल्लीची मुघल सल्तनत हादरली होती. मात्र, एवढे मोठे साम्राज्य उभे करूनही तांत्रिकदृष्ट्या शिवाजी महाराज हे मुघल किंवा विजापूरच्या नजरेत केवळ एक ‘जमीनदार’ किंवा ‘बंडखोर’ होते.
त्या काळात कोणत्याही राजाला मान्यता मिळण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक असायला हवा, असा तत्कालीन संकेत होता. अनेक मराठा सरदार स्वतःला महाराजांपेक्षा श्रेष्ठ किंवा बरोबरीचे समजत होते, कारण ते आदिलशहा किंवा निजामशहाचे चाकर (वतनदार) होते. या अंतर्गत वादाला पूर्णविराम देण्यासाठी, परकीय सत्तांना चोख उत्तर देण्यासाठी आणि जगाला हे सांगण्यासाठी की ‘हे स्वराज्य कोणाचे मांडलिक नाही, तर ते स्वतंत्र आहे’, महाराजांनी राज्याभिषेकाचा अभूतपूर्व निर्णय घेतला.
रायगड: स्वराज्याची राजधानी आणि सुवर्णसिंहासन
राज्याभिषेकासाठी निवड झाली ती ‘दुर्गराज रायगडाची’. ज्या किल्ल्याला पायथा नव्हता, ज्याचा कडा तासलेला होता आणि जिथे पोहोचणे शत्रूला अशक्य होते, असा हा रायगड. गागाभट्टांसारख्या काशीच्या प्रख्यात विद्वानाला राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी पाचारण करण्यात आले.
महाराजांसाठी ३२ मण सोन्याचे भव्य ‘सुवर्णसिंहासन’ तयार करण्यात आले. या सिंहासनावर जडवलेली रत्ने, हिरे आणि अष्टप्रधान मंडळाची रचना ही केवळ संपत्तीचे प्रदर्शन नव्हती, तर ती मराठ्यांच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक होती. देशातील सात पवित्र नद्यांचे पाणी कलशात आणून महाराजांवर जलाभिषेक करण्यात आला. जेव्हा गागाभट्टांनी महाराजांच्या डोक्यावर छत्र धरले आणि घोषणा केली— “प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय!” तेव्हा गडावरील तोफा कडकडल्या आणि सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतून स्वातंत्र्याचा जयघोष गुंजला.
रयतेचा राजा आणि लोककल्याणकारी राज्य
शिवराज्याभिषेकाने जगाला एका नव्या राज्यपद्धतीची ओळख करून दिली. तोपर्यंत राजे हे प्रजेला लुटण्यासाठी आणि स्वतःच्या विलासासाठी गादीवर येत असत. मात्र, शिवाजी महाराज हे गादीवर आले ते प्रजेचे रक्षण करण्यासाठी. म्हणूनच ते ‘रयतेचे राजे’ बनले.महाराजांनी राज्याभिषेकानंतर स्वतःचे चलन (होण आणि शिवराई) सुरू केले. स्वतःची भाषा वृद्धिंगत करण्यासाठी ‘राज्यव्यवहार कोश’ तयार केला. परकीय आक्रमकांच्या पारतंत्र्यातून मुक्त होऊन आपली संस्कृती, आपली मंदिरे आणि आपली अस्मिता कशी जपावी, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून आजच्या लोकशाही सुशासनाची (Good Governance) पायाभरणी ३५० वर्षांपूर्वीच केली होती.
आजच्या काळातील शिवराज्याभिषेकाचे महत्त्व
आज ६ जून रोजी आपण जेव्हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतो, तेव्हा तो केवळ भूतकाळातील एका घटनेचे कौतुक म्हणून नव्हे, तर त्यातून प्रेरणा घेण्यासाठी साजरा करायला हवा. महाराजांनी दगडधोंड्यांच्या, म्हणजेच अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असलेल्या भूभागात सुवर्णसिंहासन उभे केले. आज आपल्यासमोर बेरोजगारी, सामाजिक दऱ्या, आणि नैतिक मूल्यांचा ऱ्हास यांसारखी अनेक संकटे आहेत. अशा वेळी ‘इतिहासालाही भीती वाटेल’ असे धाडस अंगी बाळगून स्वाभिमानाने उभे राहणे हीच छत्रपतींना खरी आदरांजली ठरेल. ३५० वर्षांनंतरही रायगडाच्या त्या सुवर्णसिंहासनाची चमक तसूभरही कमी झालेली नाही. कारण ते सिंहासन सोन्याचे कमी आणि मावळ्यांच्या रक्ताचे व शिवरायांच्या अथांग विचारांचे जास्त बनलेले होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या दूरदृष्टीला त्रिवार मानाचा मुजरा!





