रेल्वे गाड्यांमध्ये पैसे मागणारे किन्नर निघाले ‘नकली’
मुंबई/जबलपूर : निर्भीड समाचार वृत्तसेवा
ट्रेनमधून प्रवास करताना टाळ्या वाजवून प्रवाशांकडे पैशांची मागणी करणाऱ्या किन्नरांचे दर्शन आपल्याला नेहमीच घडते. अनेकदा भीतीपोटी किंवा आदरापोटी प्रवासी त्यांना पैसेही देतात. मात्र, आता रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत सतर्क करणारी बातमी समोर आली आहे. गाड्यांमध्ये फिरणारे सर्वच किन्नर खरे नसून, त्यातील अनेक जण केवळ पैसे कमावण्यासाठी किन्नरांचे सोंग घेत असल्याचे समोर आले आहे. पश्चिम मध्य रेल्वेचे (WCR) मुख्यालय असलेल्या जबलपूरमध्ये रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) केलेल्या एका विशेष कारवाईत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
६ महिन्यांत ६० हून अधिक तरुण अटकेत
जबलपूर आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत रेल्वे गाड्यांमधून ६० हून अधिक अशा तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे, जे हुबेहूब किन्नरांसारखा पेहराव आणि मेकअप करून प्रवाशांकडून पैसे उकळत होते. आरपीएफच्या पथकाने जेव्हा संशयावरून या लोकांची कसून चौकशी आणि वैद्यकीय तपासणी केली, तेव्हा हे सर्वजण पुरुष (तरुण) असल्याचे निष्पन्न झाले. या खुलाशामुळे रेल्वे प्रशासनासह प्रवाशांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे.
बेरोजगारीमुळे बनले ‘नकली किन्नर’
आरपीएफने अटक केलेल्या या तोतया किन्नरांकडे जेव्हा सखोल चौकशी केली, तेव्हा त्यांनी दिलेले कारण थक्क करणारे होते. आपण कोणत्याही टोळीचे सदस्य नसून, केवळ ‘बेरोजगारी’ आणि गरिबीमुळे हा मार्ग निवडल्याची कबुली या तरुणांनी दिली आहे. कोणतीही नोकरी किंवा काम मिळत नसल्यामुळे, सहज आणि जलद पैसे कमवण्याचा मार्ग म्हणून त्यांनी महिलांचे कपडे परिधान करून आणि किन्नरांचे सोंग घेऊन गाड्यांमध्ये फिरण्यास सुरुवात केली होती. अनेक प्रवासी किन्नरांना ओळखू शकत नाहीत आणि वादावादी टाळण्यासाठी लगेच पैसे देतात, याच गोष्टीचा फायदा हे तरुण घेत होते.
३ जून रोजी राबवली ‘स्पेशल मोहीम’
गेल्या काही दिवसांपासून जबलपूर रेल्वे विभागातून धावणाऱ्या विविध गाड्यांमध्ये किन्नरांचा उपद्रव वाढल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने केल्या जात होत्या. काही किन्नर प्रवाशांना पैशांसाठी धमकावत आहेत, महिला प्रवाशांशी गैरवर्तन करत आहेत आणि बळजबरीने अवैध वसुली करत आहेत, अशा गंभीर स्वरूपाच्या या तक्रारी होत्या.या तक्रारींची दखल घेत आरपीएफने ३ जून रोजी संपूर्ण जबलपूर विभागातील विविध रेल्वे गाड्यांमध्ये एकाच वेळी ‘स्पेशल चेकिंग मोहीम’ राबवली. या मोहिमेदरम्यान रेल्वे स्थानकांवर आणि धावत्या गाड्यांमध्ये संशयास्पद रित्या फिरणाऱ्या किन्नरांवर कडक पाळत ठेवण्यात आली आणि ही मोठी कारवाई करण्यात आली.
प्रवाशांना रेल्वे प्रशासनाचे आवाहन
या कारवाईनंतर रेल्वे सुरक्षा दलाने प्रवाशांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. गाड्यांमध्ये कोणीही व्यक्ती बळजबरीने पैशांची मागणी करत असेल किंवा त्रास देत असेल, तर प्रवाशांनी तात्काळ रेल्वेच्या हेल्पलाईन क्रमांकावर (139) संपर्क साधून तक्रार नोंदवावी. तसेच, अशा तोतया लोकांपासून सावध राहून त्यांना आर्थिक खतपाणी घालू नये, असेही रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.आरपीएफच्या या धडक मोहिमेमुळे गाड्यांमधील अवैध वसुलीला काही प्रमाणात आळा बसेल अशी चिन्हे असून, आगामी काळातही ही चेकिंग मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.





