समतानगर पोलिसांवर ड्रग्ज गायब केल्याचा वकील दीपक जगदेव यांचा आरोप!
मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा
मुंबईतील कांदिवली पूर्व येथील लोखंडवाला परिसरातून एक खळबळजनक आणि पोलीस प्रशासनाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका कथित पोलीस कारवाईदरम्यान समतानगर पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचा जप्त केलेला मुद्देमाल गायब केल्याचा धक्कादायक आरोप प्रसिद्ध वकील दीपक जगदेव यांनी केला आहे. या प्रकरणावरून त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर आणि विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “हे पोलीस रक्षक आहेत की भक्षक?” असा थेट आणि तिखट सवाल केला आहे. या संदर्भात वकील जगदेव यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल केली असून, संबंधित दोषी पोलिसांना तात्काळ निलंबित किंवा बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी कांदिवली लोखंडवाला परिसरातील ‘पाटील चहा’ या प्रसिद्ध दुकानावर समतानगर पोलिसांच्या एका पथकाने अचानक छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान पोलिसांनी दुकानातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गुटखा आणि अत्यंत घातक ड्रग्जसारखे अमली पदार्थ जप्त केले होते. मात्र, या मोठ्या कारवाईची रीतसर नोंद करण्याऐवजी पोलिसांनी वेगळाच खेळ सुरू केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
वकील दीपक जगदेव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज आणि गुटख्याचा मोठा साठा जप्त केल्यानंतर घटनास्थळावर उपस्थित असलेल्या पोलिसांनी संबंधित दुकानाच्या मालकाशी फोनवर संपर्क साधला. गुन्हा दडपण्यासाठी आणि प्रकरण मिटवण्यासाठी पोलिसांनी मालकाकडे लाखो रुपयांची लाच मागितली.त्यानंतर, सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) चौधरी यांच्या कथित आदेशानुसार पुढील ‘काळे कारनामे’ करण्यासाठी दुकानातील आणि परिसरातील सर्व सामान्य जनतेला तेथून हाकलून लावण्यात आले. जेणेकरून पोलिसांचे हे कृत्य कोणाच्याही लक्षात येऊ नये. यानंतरचा संपूर्ण घटनाक्रम अत्यंत धक्कादायक आहे. तिथे उपस्थित असलेल्या निळा शर्ट परिधान केलेल्या एका व्यक्तीने (जो पोलीस कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे) तो लाखो रुपयांचा बेकायदेशीर माल एका पांढऱ्या रंगाच्या गोणीत भरला. त्यानंतर तो माल शासकीय पोलीस वॅन (Police Van) मध्ये नेऊन लपवून ठेवला. हा सर्व प्रकार उरकावल्यानंतर, पोलिसांनी स्वतःचे मोबाईल व्हिडिओ कॅमेरे चालू केले आणि आपण कायदेशीर कारवाई करत असल्याचे भासवून पंचनाम्याची औपचारिकता सुरू केली.
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, पोलिसांनी प्रत्यक्ष कारवाईत लाखो रुपये किमतीचे अमली पदार्थ आणि प्रतिबंधित गुटखा जप्त केला होता. परंतु, पोलीस ठाण्यातील अधिकृत स्टेशन डायरी किंवा नोंदींमध्ये हा सर्व मुद्देमाल गायब करण्यात आला. त्याऐवजी अधिकृत कागदपत्रांवर केवळ ५,००० रुपये किमतीच्या सिगारेट्स जप्त केल्याचे दाखवून संपूर्ण प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला गेला. लाखो रुपयांचे ड्रग्ज आणि गुटखा नेमका कुठे गेला? तो बाजारात पुन्हा विकला गेला की पैशांच्या बदल्यात आरोपींना परत करण्यात आला? असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
वकील दीपक जगदेव यांनी आपल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, “ही घटना अत्यंत चिंताजनक असून मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला काळीमा फासणारी आहे. अमली पदार्थांच्या विरोधात स्वतः गृहखाते मोहीम राबवत असताना, दुसरीकडे पोलीस अधिकारीच ड्रग्ज माफियांसोबत मिळून भ्रष्टाचार करत आहेत. या गुन्ह्यात सरकारी वाहनाचा आणि पवित्र अशा पोलीस गणवेशाचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने गैरवापर करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुरावे उपलब्ध असून, एपीआय चौधरी आणि त्यांच्या पथकातील सर्व भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित किंवा बडतर्फ (Dismiss) करण्यात यावे, अशी आग्रही मागणी वकील जगदेव यांनी केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण मुंबई पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





