नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: नराधम भिवाजी कांबळेला फाशी द्या..!!
मुंबई/नाशिक/सिन्नर : निर्भीड समाचार वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील नसरापूर (ता. सिन्नर) येथे एका ३ वर्षांच्या चिमुकलीवर ६० वर्षीय नराधम भिवाजी कांबळे याने अत्याचार करून तिची निर्घण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून जनतेमध्ये संताप उसळला आहे.
माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना नाशिक जिल्ह्याला लागून असलेल्या नसरापूर (ता. सिन्नर) परिसरात उघडकीस आली आहे. अवघ्या ३ वर्षांच्या निरागस चिमुकलीवर ६० वर्षांच्या भिवाजी कांबळे या नराधमाने अत्याचार करून तिची निर्घण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून, गुन्हेगाराला भरचौकात फाशी देण्याची मागणी जोर धरत आहे.
घटनेचा थरार आणि पोलिसांची कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित बालिका घराबाहेर खेळत असताना आरोपी भिवाजी कांबळे याने तिला आमिष दाखवून निर्जनस्थळी नेले. तिथे तिच्यावर अनन्वित अत्याचार केल्यानंतर आपली ओळख पटेल या भीतीने नराधमाने त्या चिमुकलीचा गळा आवळून खून केला. मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता तिचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून संशयित आरोपी भिवाजी कांबळे याला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी या प्रकरणाचा तपास जलदगतीने (फास्ट ट्रॅक) करून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, पोलिसांच्या या आश्वासनावर नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
जुना गुन्हेगार बाहेर आलाच कसा?
या घटनेतील सर्वात संतापजनक बाब म्हणजे आरोपी भिवाजी कांबळे हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही तो लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात तुरुंगात होता. “अशा विकृत मानसिकतेचा माणूस तुरुंगातून बाहेर येतोच कसा?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. जर त्याला आधीच कठोर शिक्षा झाली असती, तर आज एका ३ वर्षांच्या चिमुकलीचा जीव वाचला असता, अशी भावना व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या आणि कायद्याच्या ढिसाळपणामुळेच अशा नराधमांचे धाडस वाढत असल्याची टीका होत आहे.
मालेगाव प्रकरणाची आठवण आणि आश्वासनांचा पाऊस
नाशिकचे पालकमंत्री आणि पोलीस प्रशासन ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टाच्या बाता मारत असले तरी, जनतेचा विश्वास उडालेला दिसत आहे. मालेगाव येथे घडलेल्या अशाच एका क्रूर अत्याचार प्रकरणात अद्यापही पीडित कुटुंबाला पूर्ण न्याय मिळालेला नाही. “मालेगावच्या घटनेत अजून न्याय मिळाला नाही, मग नसरापूरच्या घटनेत तुम्ही फास्ट ट्रॅकचे आश्वासन देताय ते तरी पूर्ण होणार का?” असा थेट सवाल जनतेकडून विचारला जात आहे.
राजकीय वातावरण तापले: ‘नाजायज सरकार’वर टीका
राज्यातील ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून विरोधक आणि सर्वसामान्य नागरिक राज्य सरकारवर तुटून पडले आहेत. सोशल मीडियावरून “नाजायज सरकार आता तरी सुधारा” अशा शब्दांत संताप व्यक्त केला जात आहे. केवळ आश्वासनांचे गाजर न दाखवता अशा नराधमांना भरचौकात लटकवले पाहिजे, तरच गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होईल, अशी जनभावना निर्माण झाली आहे.
पीडित कुटुंबाचा आक्रोश
घटनेनंतर पीडित कुटुंबाचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे. “आमच्या चिमुरडीचा काय दोष होता?” असा प्रश्न विचारताना तिच्या आई-वडिलांचे डोळे सुकले आहेत. संपूर्ण नसरापूर गावाने या घटनेचा निषेध करत कडकडीत बंद पाळला असून आरोपीला जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
व्यवस्थेला सुधारण्याची वेळ
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात चिमुकल्या मुली सुरक्षित नसतील, तर ती अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. नुसते गुन्हे दाखल करणे आणि आश्वासने देणे पुरेसे नाही. कायदे अधिक कडक करून, अशा प्रवृत्तींना समाजात पुन्हा स्थान मिळणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. नसरापूरची घटना ही केवळ एक गुन्हेगारी घटना नसून ती आपल्या व्यवस्थेच्या अपयशाचे लक्षण आहे.
आता सर्वांचे लक्ष न्यायालयाकडे लागले असून, या नराधमाला लवकरात लवकर फासावर लटकवले जाते की पुन्हा कायद्याच्या पळवाटांचा आधार घेऊन तो सुटतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.





