“संगमनेरचा डंका देशात! एकाच वेळी ‘IAS’ आणि ‘IPS’ देऊन तालुक्याने कोरले नाव; ऋतुजा आणि धनंजयचा सुवर्णमयी विजय!”
मुंबई/संगमनेर : निर्भीड समाचार News Desk
देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC 2025) परीक्षेत संगमनेरच्या दोन गुणवंतांनी उत्तुंग यश संपादन करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कु. ऋतुजा अशोक गायकवाड हिने देशात १०६ वा रँक मिळवत ‘आयएएस’ (IAS) पदाला गवसणी घातली आहे, तर चि. धनंजय संजय दिघे याने ५२९ व्या रँकसह ‘आयपीएस’ (IPS) पदासाठी निवड मिळवली आहे.
Advertisement
नान्नज दुमाला (ता. संगमनेर) येथील रहिवासी असलेल्या ऋतुजा अशोक गायकवाड हिने आपल्या जिद्दीच्या जोरावर ऑल इंडिया रँक १०६ प्राप्त केला. तिची भारतीय प्रशासकीय सेवेसाठी (IAS) निवड झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. अत्यंत चिकाटीने अभ्यास करून तिने हे यश मिळवत मुलींसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील सुपुत्र धनंजय संजय दिघे याने ऑल इंडिया रँक ५२९ मिळवून पोलीस दलातील मानाच्या ‘आयपीएस’ (IPS) पदाला गवसणी घातली आहे. धनंजयच्या या यशामुळे जोर्वे परिसरासह संपूर्ण तालुक्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
एकाच वेळी तालुक्यातून दोन विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेतील उच्च पदांवर झेप घेतल्याने संगमनेरच्या शैक्षणिक वारशाचा वारू पुन्हा एकदा जोमाने उधळला आहे. या दोन्ही गुणवंतांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक आणि मार्गदर्शकांना दिले आहे.
या खडतर परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त करून संगमनेरचा नावलौकिक वाढवणाऱ्या ऋतुजा आणि धनंजय यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी आणि देशसेवेच्या प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





