पुण्यात कोरेगाव पार्कमध्ये महिला वकिलावर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार!
मुंबई/पुणे : निर्भीड समाचार वृत्तसेवा
शहरातील अत्यंत उच्चभ्रू आणि पॉश परिसर समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क-मुंढवा रस्त्यावर एका महिला वकिलावर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे पुणे शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन संशयित आरोपींना अटक केली असून, एका फरार आरोपीचा शोध कसून घेतला जात आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला पेशाने वकील असून रविवारी रात्री ती तिच्या मैत्रिणींसोबत कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेली होती. तेथे तिची एका व्यक्तीशी तोंडओळख झाली. पार्टी संपल्यानंतर पीडित महिलेच्या मैत्रिणी तेथून निघून गेल्या. महिला हॉटेलबाहेर एकटीच उभी असल्याचे पाहून आरोपीने तिच्याशी जवळीक साधली आणि “मी तुला सुरक्षित घरी सोडतो,” असा बहाणा करून तिचा विश्वास संपादन केला.अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून महिला त्याच्या कारमध्ये बसली. कारमध्ये इतरही काही जण उपस्थित होते. कार कोरेगाव पार्क ते मुंढवा रस्त्यावरून धावत असताना, आरोपींनी गाडीतच महिलेसोबत अश्लील कृत्ये करण्यास आणि तिचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. एका मुख्य आरोपीने धावत्या कारमध्येच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
मित्रांना लाऊडस्पीकरवर फोन करून अश्लील शेरेबाजी
या घटनेदरम्यान आरोपींच्या क्रूरतेची सीमा गाठली गेली. कार चालवत असताना मुख्य आरोपीने त्याच्या इतर दोन मित्रांना फोन केला आणि तो फोन मुद्दाम ‘लाऊडस्पीकर’वर ठेवला. फोनवरील त्या मित्रांनी आणि कारमध्ये बसलेल्या इतरांनी पीडित महिलेवर अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील टिप्पण्या केल्या. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिला वकिलाने आरोपींना त्या मित्रांना प्रत्यक्ष घटनास्थळी बोलावण्यास आणि माफी मागण्यास भाग पाडले.त्यानंतर आरोपींनी गाडी एका निर्जन ठिकाणी थांबवली आणि त्यांचे मित्रही दुसऱ्या वाहनाने तेथे पोहोचले. तेथे महिला कारमधून खाली उतरली आणि त्यांच्यात जोरदार वाद झाला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी पीडित महिलेची पर्स आणि साहित्य रस्त्यावर फेकून दिले आणि दोन्ही गाड्यांसह रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळ काढला.
पोलिसांची तत्परता आणि तीन आरोपींना अटक
या धक्कादायक प्रसंगानंतर पीडित महिलेने एका स्थानिक नागरिकाच्या मदतीने आपल्या मित्राशी संपर्क साधला आणि थेट कोरेगाव पार्क पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवली. पोलिसांनी परिसरातील आणि हॉटेलमधील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले. तपासाअंती पोलिसांनी अभिषेक मुकटे, धनंजय सोरटे आणि आदेश शिंदे या तीन आरोपींना अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केली आहे.
पोलीस आयुक्तांचे वक्तव्य
या संपूर्ण प्रकरणावर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “हे प्रकरण अत्यंत गंभीर असून पोलीस याचा सखोल तपास करत आहेत. तीन मुख्य आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून चौथ्या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”या घटनेमुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेवर आणि विशेषतः रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षिततेवर मोठ्या प्रमाणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.





