NEET पेपर लीक प्रकरणाचा मास्टरमाईंड प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी अटकेत!


मुंबई/लातूर: निर्भीड समाचार वृत्तसेवा

वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या NEET-UG 2026 परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार (किंगपिन) निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याला बेड्या ठोकल्या आहेत. रसायनशास्त्राचा (Chemistry) हा तज्ज्ञ प्राध्यापक नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलमध्ये समाविष्ट होता. सीबीआयने कुलकर्णी यांची कसून चौकशी केली असून, त्यांनी यापूर्वी नॅशनल टेस्टिंग एजन्सीसाठी आणखी कोणकोणत्या परीक्षांचे पेपर सेट केले होते आणि ते देखील लीक केले होते का, या बाजूने कसून तपास सुरू केला आहे.

दयानंद कॉलेजमधून निवृत्ती ते पेपरफुटीचा किंगपिन
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, पी. व्ही. कुलकर्णी हे लातूर येथील नामांकित दयानंद सायन्स कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. सुमारे ३ ते ४ वर्षांपूर्वी ते सेवेतून निवृत्त झाले होते. त्यांच्या विषयातील दांडग्या अभ्यासामुळे एनटीएने (NTA) त्यांची निवड नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका सेट करणाऱ्या गोपनीय समितीमध्ये केली होती.

याच अधिकाराचा आणि गोपनीयतेचा गैरवापर करत कुलकर्णी यांनी मूळ प्रश्नपत्रिका लीक केली. सीबीआयच्या तपासात समोर आले आहे की, एप्रिल २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजे परीक्षा होण्याच्या अवघ्या काही दिवस आधी, कुलकर्णी यांनी पुण्यातील आपल्या निवासस्थानी काही निवडक विद्यार्थ्यांचे स्पेशल कोचिंग क्लासेस घेतले होते. या गुप्त वर्गांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत येणारे प्रश्न, त्याचे पर्याय आणि अचूक उत्तरे हुबेहूब लिहून दिली होती, जी ३ मे रोजी झालेल्या मुख्य परीक्षेशी तंतोतंत जुळली.

‘या’पूर्वी कोणकोणते पेपर सेट केले? सीबीआयचा मुख्य रोख
सीबीआयच्या दिल्ली आणि स्थानिक पथकांनी कुलकर्णी यांना पुण्यातून ताब्यात घेऊन लातूर आणि पुणे परिसरात विविध ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान त्यांच्याकडून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

Advertisement

सध्या सीबीआयच्या चौकशीचा मुख्य रोख हा आहे की, कुलकर्णी हे गेल्या अनेक वर्षांपासून NTA च्या पॅनेलवर कार्यरत असल्यामुळे त्यांनी यापूर्वी कोणकोणत्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे पेपर सेट केले होते? त्यांनी यापूर्वीच्या नीट परीक्षांचे किंवा जेईई (JEE) सारख्या इतर मोठ्या परीक्षांचे पेपर देखील लीक करून करोडो रुपयांची उलाढाल केली आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सीबीआय करत आहे. या चौकशीमुळे मागील काही वर्षांतील परीक्षाही आता संशयाच्या भोवऱ्यात आल्या आहेत.

मनीषा वाघमारेच्या चौकशीतून लागला सुगावा
सीबीआयने यापूर्वी १४ मे रोजी मनीषा वाघमारे नावाच्या एका महिला संशयिताला अटक केली होती. मनीषा ही ब्युटी पार्लर चालवत होती आणि तिचा विद्यार्थ्यांशी संपर्क होता. तिनेच परीक्षा पास होण्यासाठी शॉर्टकट शोधणाऱ्या श्रीमंत विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांना प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांच्यापर्यंत पोहोचवले होते. मनीषाच्या कसून चौकशीनंतरच या संपूर्ण घोटाळ्याचे धागेदोरे थेट पेपर सेट करणाऱ्या मुख्य प्राध्यापकापर्यंत पोहोचले.

लातूर पॅटर्नच्या क्लासेस चालकांचे धाबे दणाणले
लातूर हा संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात शैक्षणिक हब तसेच ‘लातूर पॅटर्न’साठी प्रसिद्ध आहे. मात्र, या प्रकरणाचा मुख्य आरोपी लातूरचाच निवृत्त प्राध्यापक निघाल्याने संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र हादरले आहे. सीबीआयने शुक्रवारी लातूरमधील एका नामांकित खाजगी कोचिंग क्लासेस चालकाच्या घरावर आणि फ्लॅटवरही छापे टाकून दिवसभर चौकशी केली. कुलकर्णी यांनी या कोचिंग क्लासेस चालकांच्या संगनमताने तर हा पेपरफुटीचा बाजार मांडला नव्हता ना, यादृष्टीने तपास चक्र गतिमान झाली आहेत. आरोपीला लवकरच न्यायालयात हजर करून पुढील पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x