१२ कोटींची चोरी करून पळणारे नेपाळी नोकर अटकेत; ७ किलो सोने जप्त!


मुंबई/उत्तर प्रदेश : निर्भीड समाचार वृत्तसेवा

उत्तर प्रदेशातील रामपूर पोलिसांनी तेलंगणातून तब्बल १२ कोटी रुपयांचा खजिना चोरून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक पुरुष, त्याची पत्नी आणि मेहुणी (पत्नीची बहीण) यांचा समावेश आहे. हे तिघेही मूळचे नेपाळचे रहिवासी असून, एका श्रीमंत कुटुंबात नोकर म्हणून काम करत होते. त्यांच्याकडून ७ किलो सोने, १ किलो चांदी आणि मोठी रोकड जप्त करण्यात आली आहे.

विश्वासू नोकर बनून घरात प्रवेश
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तेलंगणातील एका अत्यंत संपन्न आणि प्रतिष्ठीत कुटुंबात घरकाम करत होते. घरमालकाचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांनी घरात कुठे किती मालमत्ता ठेवली आहे, याची खडानखडा माहिती मिळवली. मालक घरात नसताना किंवा गाफील असताना या तिघांनी कपाटांचे टाळे तोडून घरातील सर्व सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली. चोरीची रक्कम आणि दागिने इतके जास्त होते की, त्यांचे बाजारमूल्य सुमारे १२ कोटी रुपये आहे.

नेपाळला पळून जाण्याचा प्लॅन
चोरी केल्यानंतर तेलंगणा पोलिसांना गुंगारा देऊन हे तिघेही थेट उत्तर प्रदेशच्या दिशेने निघाले. रामपूरमार्गे नेपाळची आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून कायमचे पळून जाण्याचा त्यांचा प्लॅन होता. एकदा नेपाळमध्ये प्रवेश केला की भारतीय पोलिसांच्या तावडीतून सुटणे सोपे होईल, असा विचार त्यांनी केला होता. मात्र, तेलंगणा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांचा माग काढत उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला.

Advertisement

पोलिसांनी अशी लावली सापळा रचून अटक
रामपूरच्या शाहबाद पोलीस ठाण्याच्या पथकाला आणि स्थानिक गुन्हे शाखेला (SOG) हायवेवर काही संशयित लोक प्रवास करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ सीमावर्ती भागात नाकाबंदी केली. संशयास्पद वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये बसलेले पती, पत्नी आणि मेहुणी पोलिसांना पाहून घाबरले.पोलिसांनी त्यांच्या सामानाची झडती घेतली असता अधिकारीही चक्रावून गेले. त्यांच्या बॅगांमधून तब्बल ७ किलो शुद्ध सोने, १ किलो चांदीचे दागिने आणि लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. तेव्हा त्यांनी तेलंगणातून ही चोरी केल्याची कबुली दिली.

‘नेपाळी नोकर’ टोळीची मोडस ऑपेरांडी
पोलीस तपासात समोर आले आहे की, ही एक संघटित टोळी असून ते भारतातील मोठ्या शहरांमध्ये घरकाम मिळवण्यासाठी येतात. आधार कार्ड किंवा ओळखपत्रांची खोटी कागदपत्रे देऊन ते श्रीमंत कुटुंबात काम मिळवतात. काही महिने अतिशय प्रामाणिकपणे काम करून मालकाचा विश्वास जिंकतात आणि मोठी संधी मिळताच एकाच रात्रीत संपूर्ण घर साफ करून नेपाळला पळ काढतात.रामपूर पोलिसांनी या घटनेची माहिती तेलंगणा पोलिसांना दिली असून, तेलंगणा पोलिसांचे एक विशेष पथक आरोपींचा ताबा घेण्यासाठी रामपूरला रवाना झाले आहे. या कारवाईमुळे एका मोठ्या आंतरराष्ट्रीय घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x