केतन अग्रवाल मर्डर केस: मंगेतर सियाची धक्कादायक कबुली!
मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा
पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या लोहगड किल्ल्यावर झालेल्या २६ वर्षीय तरुण व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल याच्या हत्येप्रकरणी (Ketan Agarwal Murder Case) लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. अपघात भासवून करण्यात आलेल्या या हत्याकांडाचा तपास करत असताना मुख्य आरोपी मंगेतर सिया गोयल हिने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला आहे. “मी सुरुवातीला एकटीच केतनचा काटा काढणार होते, पण १४ जून रोजी पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यामुळे मला माझा प्रियकर चेतन चौधरी याला प्रत्यक्ष गुन्ह्यात सामील करावे लागले,” अशी धक्कादायक कबुली सियाने पोलीस चौकशीत दिली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पुण्यातील उद्योगपतीचा मुलगा केतन अग्रवाल याचा विवाह सिया गोयल हिच्याशी निश्चित झाला होता आणि त्यांचा साखरपुडाही पार पडला होता. मात्र, सियाचे पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या चेतन चौधरी नावाच्या युवकासोबत गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. कुटुंबाच्या दबावामुळे सगाई मोडणे शक्य नसल्याने, तिने केतनला कायमचे संपवण्याचा अंगावर काटा आणणारा कट रचला.
१४ जूनचा तो पहिला अयशस्वी प्रयत्न!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सियाने सर्वात आधी एकटीनेच केतनचा खून करण्याचा प्लॅन केला होता. यासाठी तिने १४ जून रोजी केतनला लोहगड किल्ल्यावर फिरण्याच्या बहाण्याने नेले. किल्ल्याच्या एका निर्जन आणि खोल दरी असलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर, सियाने केतनला मागून जोरात दरीच्या दिशेने ढकलून दिले.परंतु, त्या दिवशी केतन नशिबाने वाचला. पडत असताना त्याचा हात एका झाडाच्या झुडपाला लागला आणि तो दरीच्या कडेला लटकला. केतनने जेव्हा घाबरून सियाला विचारले, “तू मला धक्का का दिलास?” तेव्हा शातीर सियाने तात्काळ खोटे सांगत विषय फिरवला. “तिथे मोठा साप होता, मी तुला सापापासून वाचवण्यासाठी बाजूला ढकलत होते,” असे तिने भासवले. निष्पाप केतनने तिच्यावर विश्वास ठेवला आणि घरी येऊन सर्वांना सांगितले की, सियामुळे आज माझा जीव वाचला.
१४ जूननंतर चेतनची प्लॅनमध्ये एन्ट्री
पहिला प्रयत्न अपयशी ठरल्याने सिया पूर्णपणे बिथरली होती. तिला समजले की ती एकटी हे काम करू शकत नाही. त्यानंतर तिने तिचा प्रियकर चेतन चौधरी याला संपूर्ण योजनेची माहिती दिली. पोलिसांनी काढलेल्या कॉल रेकॉर्ड्सनुसार (CDR), गेल्या काही महिन्यांत या दोघांमध्ये तब्बल २,००४ वेळा फोनवर संभाषण झाले होते, ज्यातून हत्येची रूपरेषा आखली गेली.
१८ जूनचा ‘डेथ वॉरंट’ आणि हत्येचा थरार
१४ जूनच्या अपयशानंतर, सियाने १८ जून रोजी पुन्हा एकदा केतनच्या प्री-बर्थडे सेलिब्रेशनचे निमित्त साधून त्याला लोहगड किल्ल्यावर आणले. यावेळी ठरलेल्या प्लॅननुसार, चेतन चौधरी हा आधीच हुडी घालून त्यांचा माग काढत किल्ल्यावर पोहोचला होता. किल्ल्यावरील दरीच्या कडेला पोहोचताच, सियाने चेतनला ठरलेला छुपा इशारा (Signal) दिला. केतन काही समजण्याच्या आत, या दोघांनी मिळून त्याला ४०० फूट खोल दरीमध्ये ढकलून दिले.
अपघाताचा बनाव आणि पोलिसांचा संशय
हत्या केल्यानंतर सियाने स्वतः रडून केतनच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना फोन केला व केतनचा पाय घसरून तो दरीमध्ये पडल्याचा बनाव रचला. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, परंतु केतनच्या वडिलांचा संशय आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) मध्ये हुडी घातलेला एक संशयास्पद युवक (चेतन) वारंवार सियाच्या संपर्कात दिसत असल्याने पोलिसांचा संशय बळावला.कसून चौकशी केल्यानंतर आणि तांत्रिक पुरावे समोर ठेवताच सिया आणि चेतन या दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. सध्या दोघेही पोलीस कोठडीत असून, स्वतःच्या स्वार्थासाठी एका निष्पाप तरुणाचा बळी घेणाऱ्या या जोडप्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून केली जात आहे.





