मुंबईतील जोगेश्वरीत १२ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार..!!
मुंबई :
महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न ऐरणीवर असल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. हे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मुंबईतील जोगेश्वरी परिसरात अवघ्या १२ वर्षांच्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं उघड झालंय.
मुलीला एकटे बघून हे नराधम मुलीला त्यांच्या जोगेश्वरी (संजय नगर) येथील घरी घेऊन गेले आणि त्यानंतर या नराधमांनी मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली असून जनसामान्यांत संतापाची लाट पसरली आहे. या घटनेमुळे कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असल्याची माहिती आहे त्यातील एक आरोपी एसी मेकॅनिक असल्याची माहिती आहे. अल्पवयीन मुलगी दादर रेल्वे स्थानकात भटकत असताना पोलिसांना संशय आला. त्यांनी तिची विचारपुस केली असता घडलेली सर्व हकीकत त्यांनी पोलिसांनी सांगितली. तात्काळ दादर पोलिसांनी जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क केल्यानंतर एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झालं असल्याची तक्रार आल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर त्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं.
पीडित मुलीच्या जबाबानंतर गुन्ह्यात सामूहिक बलात्कार आणि बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायदा अंतर्गत कलमाची वाढ करून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.





