थेट पाकिस्तानच्या ISI शी कनेक्शन; महाराष्ट्रातून संशयित एजंटला अटक!
मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा
देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेला खिंडार पाडण्याचा पाकिस्तानच्या ‘इंटर-सर्विसेस इंटेलिजन्स’ (ISI) या गुप्तचर संघटनेचा एक मोठा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. भारतीय लष्कराची आणि हवाई दलाची अत्यंत संवेदनशील व गोपनीय माहिती पाकिस्तानात पाठवणाऱ्या देशद्रोही हस्तकांना आर्थिक रसद (फंडिंग) पुरवणाऱ्या एका मुख्य हस्तकाला महाराष्ट्रातून अटक करण्यात आली आहे. राजस्थान पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीआयडी (इंटेलिजन्स) पथकाने छत्रपती संभाजीनगरमधील (औरंगाबाद) हर्सूल परिसरातून रफीक चाँद शेख (वय ४१) या संशयित एजंटला ताब्यात घेतले आहे. त्याच्या अटकेमुळे संपूर्ण देशात सक्रिय असलेल्या आयएसआयच्या गुप्त आर्थिक नेटवर्कचा (Spying Funding Network) पर्दाफाश झाला आहे.
हेरगिरी करणाऱ्या दोन मुख्य आरोपींशी कनेक्शन: तपास यंत्रणांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये राजस्थानच्या जैसलमेरमधून झबरा राम आणि आसाममधील भारतीय हवाई दलाच्या दिब्रुगड तळावर कार्यरत असलेला एमटीएस कर्मचारी सुमित कुमार यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या दोघांवर भारतीय संरक्षण दलाशी संबंधित लढाऊ विमानांचे लोकेशन, मिसाइल सिस्टीम आणि इतर अत्यंत गोपनीय डेटा पाकिस्तानी हँडलरला पुरवल्याचा आरोप होता.
सुरक्षा यंत्रणा जेव्हा या दोन्ही देशांतर्गत आरोपींच्या बँक खात्यांची आणि आर्थिक व्यवहारांची बारकाईने चौकशी करत होत्या, तेव्हा एक धक्कादायक माहिती समोर आली. या दोन्ही आरोपींना पाकिस्तानातून हेरगिरीच्या बदल्यात मिळणारा पैसा थेट महाराष्ट्रातून ट्रान्सफर केला जात होता. आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत (Money Trail Tracking) सीआयडी इंटेलिजन्सची टीम थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचली आणि त्यांनी मुख्य सुत्रधार रफीक चाँद शेखच्या मुसक्या आवळल्या.
४ वर्षांपासून पाकिस्तान हँडलरच्या थेट संपर्कात: प्राथमिक चौकशीत समोर आलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. रफीक चाँद शेख हा स्वतः थेट लष्करी तळावर जाऊन किंवा कोणत्याही माध्यमातून गुप्त माहिती गोळा करत नव्हता. त्याचे काम केवळ आणि केवळ ‘फंडिंग एजंट’ म्हणून पैसे व्यवस्थापित करण्याचे होते. रफीक हा गेल्या सुमारे चार वर्षांपासून सोशल मीडियाच्या (फेसबुक व व्हॉट्सॲप) माध्यमातून पाकिस्तानातील एका मुख्य आयएसआय (ISI) हँडलरच्या थेट संपर्कात होता.
त्या हँडलरच्या आदेशानुसार रफीकने स्वतःच्या नावावर, तसेच घरातील इतर सदस्य आणि मित्रांच्या नावावर अनेक बोगस बँक खाती उघडली होती. पाकिस्तानातून वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय छुप्या मार्गांनी आधी रफीकच्या या भारतीय बँक खात्यांमध्ये लाखो रुपयांचा निधी जमा केला जायचा. त्यानंतर, पाकिस्तानी हँडलर ज्या भारतीय हेरांचे नाव सांगेल, त्यांच्या खात्यात रफीक टप्प्याटप्प्याने हा देशद्रोहाचा पैसा सुरक्षितपणे ट्रान्सफर करायचा.
आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा शोध आणि देशव्यापी तपास सुरूराजस्थान सीआयडी आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, रफीक चाँद शेखने आतापर्यंत किती कोटी रुपयांचे ट्रांजॅक्शन केले आहे, याचा सखोल तपास केला जात आहे. ३० जून रोजी झालेल्या या अटकेनंतर त्याला जयपूरच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपासासाठी त्याची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे.
या आंतरराष्ट्रीय आर्थिक साखळीत महाराष्ट्रातील किंवा इतर राज्यातील आणखी कोणकोणते लोक सामील आहेत, देशद्रोहाचा हा काळा पैसा नेमका कोणत्या व्यवसायांच्या नावाखाली भारतात येत होता आणि याचे जाळे आणखी कुठे पसरले आहे, याचा छडा लावला जात आहे. देशविरोधी कारवाया करणाऱ्या आणि भारताच्या अखंडतेला व सुरक्षेला नखा लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, असा कडक इशारा सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे.





