“क्रांतीनगरात रंगला कलाविष्कार; भारतमाता विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न!”


(प्रतिनिधी, मुंबई) : किसन राम गायकवाड

“नृत्याची पाऊले, गाण्याचे सूर आणि अभिनयाची जादू… क्रांतीनगरचा परिसर जणू कलेच्या रंगात न्हाऊन निघाला होता. निमित्त होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संचलित भारतमाता विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे..!! मातीच्या वासापासून ते आधुनिक युगापर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांनी आपल्या अदाकारीतून मंचावर जिवंत केला. प्रत्येक सादरीकरणामागे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची अनेक दिवसांची मेहनत स्पष्टपणे जाणवत होती. क्रांतीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संचलित भारतमाता विद्यालय या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साही आणि चैतन्यपूर्ण वातावरणात नुकताच पार पडला. ‘कला आणि संस्कार’ यांचा सुंदर संगम या सोहळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक/अध्यक्ष श्री. सम्रतराव कांबळे होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून विभागाच्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती पुष्पा रमेश कळंबे उपस्थित होत्या. दीपप्रज्वलन आणि महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत कलागुणांचे प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली. छोट्या गटातील विद्यार्थ्यांनी बडबड गीतांवर ठेका धरला, तर मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कोळीगीत, लावणी आणि देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमात रंग भरला.

Advertisement

प्रमुख पाहुण्या नगरसेविका श्रीमती पुष्पा रमेश कळंबे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “शिक्षणामुळेच माणसाचा सर्वांगीण विकास होतो. भारतमाता विद्यालयाने क्रांतीनगर परिसरातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.” तसेच त्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. याप्रसंगी शैक्षणिक वर्षभरात विविध स्पर्धा, क्रीडा आणि अभ्यासात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा श्रीमती पुष्पा कळंबे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. नगरसेविका श्रीमती पुष्पा रमेश कळंबे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एक मोलाचा संदेश दिला. त्या म्हणाल्या, ‘केवळ पुस्तकी ज्ञान महत्त्वाचे नसून, अशा व्यासपीठामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. या शाळेतील मुलांमध्ये अफाट जिद्द असून त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे.’ त्यांच्या या शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह संचारला.”या कार्यक्रमासाठी क्रांतीनगर परिसरातील पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या पाल्याला मंचावर कला सादर करताना पाहून पालकांचे डोळे अभिमानाने भरून आले होते. ‘आमची मुले इतकी सुंदर कला सादर करू शकतात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,’ अशी भावना अनेक पालकांनी यावेळी व्यक्त केली. स्नेहसंमेलन संपले तरी त्याचे सूर आणि आठवणी प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत होत्या. भारतमाता विद्यालयाने आपल्या नावाप्रमाणेच एक सुसंस्कारित पिढी घडवण्याचा विडा उचलला आहे, याची प्रचिती या सोहळ्याने दिली.

“महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या मंत्राचा प्रत्यय आजच्या विद्यार्थ्यांच्या शिस्तीतून आणि कलाविष्कारातून येत होता.” “अशाप्रकारे, आनंदाची उधळण आणि सुरांच्या वर्षावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संचलित भारतमाता विद्यालयाचा हा स्नेहसंमेलन सोहळा संपन्न झाला. पसायदानाच्या पवित्र सुरांनी कार्यक्रमाची सांगता झाली. जरी पडदा पडला असला, तरी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि पालकांच्या डोळ्यांतील अभिमान या सोहळ्याचे खरे यश सांगून जात होता. निरोप घेताना प्रत्येकाच्या मनात पुढच्या वर्षीच्या ‘स्नेहबंधाची’ ओढ कायम होती.”


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x