छगन भुजबळांचा मनुस्मृतीला विरोध
मनुस्मृतीचा आता शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची चर्चा जोर धरत आहे . परंतु छगन भुजबळ यांनी अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा सहभाग करण्यावर विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांची आहे. मनुस्मृती ही शाळांमध्ये शिकवू दिली जाणार नसल्याचं छगन भुजबळ म्हणाले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत भुजबळ यांनी स्पष्टोक्ती दिली आहे.
हा महाराष्ट्र ज्या महापुरुषांनी घडवला आहे, त्या महापुरूषांची शिकवण शाळकरी मुलांना दिली पाहिजे. जे कां रंजले गांजले। त्यासि म्हणे जो आपुले ॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥ असा उपदेश देणारे तुकाराम महाराज असतील किंवा अवघे विश्वची माझे घर असे शिकविणारे संत ज्ञानेश्वर महाराज असतील. ‘धर्म, राज्य, भेद हे मानवा नसावे, सत्याने वर्तावे इशासाठी’ असे शिकवण देणारे महात्मा फुले असतील किंवा “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे”!, असं ठणकावून सांगणारे अण्णाभाऊ साठे असो, यांची शिकवण मुलांना दिली गेली पाहिजे. असं भुजबळ म्हणाले.
हे शांत होतंय न होतंय तोवर मनुस्मृतीची चर्चा
लोकसभा निवडणुकीला ४०० पारचा नारा दिला गेला. यामुळे संविधान बदललं जाईल अशा पद्धतीचा प्रचार केला गेला यामुळे दलित वर्ग नाराज असल्याचं बोललं जात आहे. हे शांत होतंय न होतंय तोवर आता मनुस्मृतीची चर्चा होऊ लागली. याचा फटका आगामी काळात बसू शकतो याचा देखील विचार आपण करायला हवा, असं भुजबळ म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत २०१९ ला निवडून आलेल्या जागांचा निकष आमच्यासाठी लावण्यात आला. आता विधानसभेला लोकसभेसारखी जागावाटपाची खटपट होता कामा नये. यासाठी आताच भाजपने ८०-९० जागा देण्याचा शब्द दिला त्याची आठवण करून द्या, अशी मागणी भुजबळ यांनी केली.
महायुतीत आल्यानंतर विधानसभेत योग्य वाटा मिळावा अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. या पार्श्वभूमीवर येत्या विधानसभेत राष्ट्रावादीच्या जागावाटपाबाबत माहिती समोर येईल. राष्ट्रवादीला येणाऱ्या विधानसभेत किती जागा दिल्या जातील ही येणारी वेळच सांगेल.





