“फेरीवाले” संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने BMC ला ठणकावलं…!!!
मुंबई सारख्या महानगरामध्ये फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. फेरीवाल्यांनी रस्त्यांवर अनधिकृतपणे आपला व्यवसाय थाटल्यामुळे याचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे. नागरिकांना रस्त्यांवर चालायला जागा मिळत नाही, यावरून नेहमीच फेरीवाले आणि नागरिक यांच्यामध्ये वाद निर्माण होतात. या वादामुळे दोघांमध्ये भांडणे देखील होतात. अशी बरीचशी उदाहरणं समोर आली आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ‘फेरीवाला’ संदर्भात मुंबई महानगर पालिकेला चांगलेच फटकारले आहे.
‘डोमिसाईल’ शिवाय फेरीवाल्यांना ‘परवाना’ न देण्याचे आदेश देणार असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. कोणीही येऊन रस्त्यावर ठेला लावणार असे कदापि चालणार नाही. इतर राज्यांमध्ये फेरीवाल्यांना डोमिसाईल बंधनकारक असताना महाराष्ट्रात हे का लागू नाही, असे खडेबोल मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगर पालिकेला सुनावले आहे. जर का कोणाला महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी डोमिसाईल असणे आवश्यक आहे. तसेच ते फेरीवाले महाराष्ट्राचेच रहिवाशी असले पाहिजेत असेही उच्च न्यायालय म्हणाले.





