अपूर्वा नेमळेकरचा भावुक प्रवास; घटस्फोट ते सुखी संसाराचा खडतर संघर्ष!
मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील ‘शेवंता’ या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेली आणि ‘बिग बॉस मराठी ४’ मध्ये आपल्या दमदार खेळाने उपविजेतेपद पटकावणारी लोकप्रिय अभिनेत्री अूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अपूर्वा आता तिचा दुसरा जोडीदार तनुज गोवळकरसोबत सुखी संसार अनुभवत असली, तरी इथपर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रवास अत्यंत वेदनादायी आणि खडतर होता. नुकत्याच दिलेल्या एका खळबळजनक मुलाखतीत तिने तिच्या पहिल्या लग्नाचा विस्कळीत झालेला संसार, कौटुंबिक संकटे आणि आर्थिक चणचणीच्या त्या गडद काळाबद्दल अत्यंत भावुक होऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
१० वर्षांचे अफेअर, पण अवघ्या २ वर्षांत मोडले लग्न: अूर्वाने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगाचा उलगडा करताना सांगितले की, तिचे तब्बल १० वर्षे प्रेमसंबंध (अफेअर) होते. ज्या व्यक्तीवर तिने जीवापाड प्रेम केले, त्याच्याशी तिने २०१४ मध्ये मोठ्या आशेने लग्नगाठ बांधली होती. परंतु, लग्न झाल्यानंतर अवघ्या २ वर्षांतच त्यांच्यात खटके उडू लागले आणि हे नाते टिकणे अशक्य झाले. अवघ्या २६ व्या वर्षी अपूर्वाच्या डोक्यावर ‘घटस्फोटित’ (Divorced) हा शिक्का बसला. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीसाठी हा मानसिक धक्का सहन करणे अत्यंत कठीण होते, असे अपूर्वा सांगते.
वडिलांचे निधन आणि आर्थिक विवंचना; खात्यात उरले होते फक्त १२५० रुपये: अपूर्वचा हा संघर्ष इथेच थांबला नाही. एकीकडे कोर्टात घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच, २०१७ मध्ये तिच्या वडिलांचे अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वडिलांच्या निधनाने ती पूर्णपणे कोलमडली.त्याच काळात तिला प्रचंड मोठ्या आर्थिक संकटालाही तोंड द्यावे लागले होते. कोर्ट-कचेऱ्या आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे तिचा सर्व पैसा संपला होता. त्या कठीण दिवसांची आठवण काढत अपूर्वा म्हणाली, “कोर्टाचे चकरा मारताना एका वेळी माझ्या बँक खात्यात फक्त १२५० रुपये शिल्लक उरले होते, तो आकडा मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही”. या नैराश्याच्या (Depression) गर्तेत केवळ तिच्या आईने आणि कुटुंबाने तिला खंबीर साथ दिली.
“जवळच्या मित्रांनीच पाठीत खंजीर खुपसला: “मुलाखतीदरम्यान अपूर्वाने तिच्या जवळच्या मित्रांबद्दल तीव्र संताप आणि खंत व्यक्त केली. “माझ्या आयुष्यात जेव्हा वादळ आले होते, तेव्हा माझ्या अत्यंत जवळच्या समजल्या जाणाऱ्या मित्रमैत्रिणींना खरी परिस्थिती ठाऊक होती. तरीही त्यांनी माझ्यासमोर खोटे चित्र उभे केले आणि माझी फसवणूक केली,” असा खळबळजनक आरोप अपूर्वाने केला आहे. मात्र, या फसवणुकीने आणि परिस्थितीनेच तिला जगात शहाणपण शिकवले आणि अधिक खंबीर बनवले.
९ वर्षे राहिली सिंगल; अपयशाची पळवाट शोधली नाही: पहिले लग्न तुटल्यानंतर अपूर्वाने घाईघाईत कोणत्याही दुसऱ्या नात्यात उडी मारली नाही. ती तब्बल ९ वर्षे सिंगल राहिली. “लोक विचारत की ‘शेवंता’ कशी काय एकटी राहू शकते? पण मनातील जखमा भरण्यासाठी मला स्वतःला वेळ द्यायचा होता,” असे ती म्हणाली. तिने स्वतःच्या पायावर उभे राहून इंडस्ट्रीमध्ये प्रचंड यश मिळवले आणि स्वतःचे हक्काचे घर व गाडी खरेदी करून यशाचे शिखर गाठले.
अखेर मिळाली सुखाची सावली; तनुजसोबत थाटला नवा संसार: अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अपूर्वाच्या आयुष्यात सुखाचे दिवस परतले. तिला चित्रपट किंवा मनोरंजन क्षेत्रातील नवरा नको होता, कारण तिला एक शांत आणि स्थिर कौटुंबिक आयुष्य हवे होते. मेट्रोमोनियल साईटच्या माध्यमातून तिची ओळख तनुज गोवळकर यांच्याशी झाली आणि दोघांच्या विचारांचे सूत जुळले.
अपूर्वा आता तनुजसोबत विवाहबंधनात अडकून आपला सुखी संसार अत्यंत आनंदाने एन्जॉय करत आहे. सोशल मीडियावर पतीसोबतचे तिचे मजेशीर आणि आनंदी रील्स चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहेत. भूतकाळातील वादळांशी धैर्याने लढून आज एका यशस्वी अभिनेत्री आणि सुखी गृहिणी म्हणून जगणाऱ्या अपूर्वाचा हा प्रवास अनेक महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.





