आंचल सक्षमच्या लहान भावाला मेसेज करायची; सक्षमच्या आईने दाखवले पुरावे!


मुंबई/नांदेड : निर्भीड समाचार वृत्तसेवा

महाराष्ट्रभर गाजलेल्या नांदेडमधील सक्षम ताटे हत्याकांडात आता एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक वळण आले आहे. सक्षमची प्रेयसी आणि त्याच्या मृतदेहासोबत लग्न करून सासरी राहणारी आंचल मामीडवार हिने काही दिवसांपूर्वी घर सोडले होते आणि सक्षमचा लहान भाऊ शिवम (शुभम) ताटे याच्यावर गंभीर गैरवर्तनाचे आरोप केले होते. मात्र, आता सक्षम आणि शिवमच्या आईने हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. उलट, आंचलच सक्षमच्या लहान भावाला सतत मेसेज करायची, असा दावा करत सक्षमच्या आई आणि आत्याने थेट मोबाईल चॅटिंगचे स्क्रीनशॉटच प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केले आहेत. या नव्या पुराव्यांमुळे या संपूर्ण प्रकरणात आता मोठी खळबळ उडाली आहे.

आंचल मामीडवारचे धक्कादायक आरोप काय होते?
आंतरजातीय प्रेमसंबंधातून गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सक्षम ताटे याची आंचलच्या वडील आणि भावाने गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेनंतर आंचलने स्वतःच्या कुटुंबाविरुद्ध जात सक्षमच्या मृतदेहाशी विवाह केला होता आणि ती सक्षमच्या आई-वडिलांसोबत राहत होती. मात्र, काही दिवसांपूर्वी ती अचानक घर सोडून आपल्या आजीकडे निघून गेली.सोशल मीडियावर तिच्यावर टीका सुरू झाल्यानंतर आंचलने जाहीरपणे सांगितले की, “सक्षमचा लहान भाऊ माझ्यासोबत अयोग्य वर्तन करत होता आणि वाईट हेतूने स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. मी ही बाब सक्षमच्या कुटुंबीयांना सांगितली, पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही; म्हणूनच मी सुरक्षिततेसाठी हे घर सोडले.

सक्षमच्या आईचा पलटवार: चॅटिंगचे स्क्रीनशॉट दाखवले
आंचलने लावलेले हे गंभीर आरोप ताटे कुटुंबाने अत्यंत जिव्हारी लावून घेतले आहेत. सक्षमची आई संगीता ताटे आणि तिच्या आत्याने माध्यम प्रतिनिधींसमोर येत आंचलचे खोटे दात उघडे पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शिवमच्या मोबाईलमधील आंचलसोबत झालेल्या संवादाचे स्क्रीनशॉट दाखवले.या स्क्रीनशॉटमध्ये आंचल शिवमशी अत्यंत जवळीक साधून बोलत असल्याचे आणि त्याला वारंवार मेसेज करत असल्याचे उघड झाले आहे. आंचलने शिवमला केलेल्या मेसेजमध्ये लिहिले होते:

Advertisement

“बोल की बाळा..”
“तू माझ्याशी बोलत का नाहीस?”
“तू इतका उदास का आहेस? तू बोलत नसल्यामुळे माझे मन लागत नाही.”

सक्षमच्या आईने रडत रडत सांगितले की, “आता आमचे एकच लेकरू शिल्लक आहे, त्याला तरी आंचलने बदनाम करू नये. शिवम अवघा १४ वर्षांचा लहान मुलगा आहे. तो आंचलला नेहमी मोठ्या आदराने ‘वहिनी वहिनी’ म्हणून हाक मारायचा आणि तिच्याशी बोलायचा. उलट आंचलच त्याला सतत मेसेज करून बोलण्याचा आग्रह धरायची.

“आरोपी आईच्या जामिनासाठी आंचलचे प्रयत्न”
या पत्रकार परिषदेत सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलच्या भूमिकेवर आणखी एक मोठा संशय व्यक्त केला आहे. सक्षमच्या हत्येच्या वेळी आंचल स्वतःच्या घरच्यांविरुद्ध लढत होती आणि आरोपींना फाशीची मागणी करत होती. मात्र, आता सक्षमच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, आंचल ही तिची आई (जी सक्षम हत्या प्रकरणातील एक आरोपी आहे) हिच्या जामिनासाठी छुपे प्रयत्न करत आहे. आजीकडे जाण्याचा बहाणा करून तिने घर सोडले आणि आता ती ताटे कुटुंबालाच बदनाम करण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप सक्षमच्या आईने केला आहे.

प्रकरणाला वेगळे वळण
एकेकाळी देशभरात ज्या आंचलच्या प्रेमाची आणि त्यागाची कौतुकाने चर्चा होत होती, तीच आंचल आता गंभीर आरोपांच्या पिंजऱ्यात उभी राहिली आहे. सक्षमच्या कुटुंबाने थेट पुरावे म्हणून व्हॉट्सॲप चॅट समोर आणल्यामुळे आंचलचे आरोप आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या संपूर्ण प्रकरणात पोलीस आता काय भूमिका घेतात आणि व्हॉट्सॲप चॅट्सच्या तपासातून काय सत्य बाहेर येते, याकडे संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x