महानंद डेअरी वर गुजरातचा ताबा

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित मुंबई म्हणजेच महानंद डेअरी आता इतिहास जमा झाली आहे, कारण महानंद डेअरीचा ताबा आता गुजरातमधील मदर डेअरीकडे सोपवण्यात आला आहे. महानंदच्या हस्तांतरणाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महानंदच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य सरकार मदर डेअरीला तब्बल २५३ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करणार आहे.
मदर डेअरी ही राष्ट्रीय दुग्धविकास विकास मंडळातर्फे चालवली जाते. महानंदची आर्थिक स्थिती ही फारच बिकट झाल्यानंतर पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी मदर डेअरीला चालवण्यास देण्याचा निर्णय झाला होता. महानंद डेअरीला राज्यातील सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था म्हणून ओळखले जात होते.
या संस्थेच्या हस्तांतरणाचा मुद्दा काही दिवसांपासून चर्चेत होता. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी या मुद्यावरुन एकमेकांवर आरोप देखील केले होते. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आणि महानंद यांच्यावतीनं पुनरुज्जीवनासाठी २५३.५७ कोटी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार यासाठी राज्य सरकारकडून २५३ कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे.
महानंद डेअरीची स्थापना मुंबई मधे ९ जून १९६७ रोजी झाली होती. राज्यातील दूधसंघांची शिखर संस्था म्हणून या दूध संघाची राज्यभर ओळख होती. महानंद ही संस्था २००४ पर्यंत फायद्यात होती. मात्र यानंतर राज्यातील दूध संघांनी स्वत:च्या नावाच्या ब्रँडनं दूध विक्री सुरु केल्यानंतर महानंदला उतरती कळा लागली असल्याचं बोललं जात आहे.




