पॉर्श अपघात प्रकरणी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे आदेश
पुणे अपघात प्रकरणाला आता वेगळं वळण प्राप्त झालं आहे. अपघातावेळी गाडीत असलेल्या प्रत्येकांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हे सर्वजण कुठे होते?, पार्टीत नेमकं काय झालं? पार्टीत कोण कोण होतं? या सर्व गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. अपघातावेळी असणाऱ्या मित्रांना त्यांच्या पालकांसोबत पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात बोलावण्यात आलं आहे. पार्टीत तिघेही सीसीटीव्हीमध्ये दिसत होते. तसेच ते मद्यप्राशन करताना दिसत होते. आतापर्यंत त्याची चौकशी करण्यात आली मात्र त्याच्या गाडीत असणाऱ्यांची चौकशी का करण्यात आली नाही?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.
याप्रकरणी आता पोलिसांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्तांच्या निर्देशाखाली नेमण्यात आलेली पोलिसांची समिती येरवडा पोलिसांची चौकशी करेल.
दोन दोन एफआरआयची का नोंदणी करण्यात आली. यासंदर्भात कोणी दबाव आणलेला का? त्या अल्पवयीन मुलाचं मेडिकल चेकअप कधी झालं. याचा तपास करण्यात येणार आहे.
याप्रकरणात अल्पवयीन मुलाला १५ तासात जामीन मंजूर केल्याप्रकरणी संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणाला आता राजकीय वळण प्राप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. इतर अनेक विरोधकांकडून आरोप करण्यात आले आहेत. या मुलाला कोण वाचवतंय? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ, संजय राऊत, राहुल गांधी यांनी यावर भाष्य केलं आहे. याप्रकरणी सरकारविरोधात टीका केली जात आहे. यामुळे राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात हजेरी लावून वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी लागली.





