दहिसरमध्ये रंगला नगरसेवकांचा सत्कार सोहळा; प्रकाशदादा सुर्वे यांच्या जनसंपर्क कार्यालयात उत्साहाचे वातावरण..!!
मुंबई : निर्भीड समाचार News Desk
दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या अशोकवन येथील जनसंपर्क कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. आगामी जनसेवेच्या प्रवासासाठी सर्व नगरसेवकांना शुभेच्छा देत, हा सन्मान सोहळा एकप्रकारे शक्तीप्रदर्शनाचे आणि एकजुटीचे केंद्र ठरला.
आमदार प्रकाश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. यात उपमहापौर, सभागृह नेते गणेश खणकर, गटनेते अमेय घोले, आणि सुधार समिती अध्यक्षा संजना दोशी यांचा विशेष सहभाग होता. तसेच, स्वीकृत नगरसेवक राज प्रकाश सुर्वे आणि विविध प्रभागांतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा यावेळी शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार प्रकाश सुर्वे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले. “नगरसेवक हे जनतेच्या थेट संपर्कात असतात, त्यामुळे लोकांच्या समस्या सोडवून शहराच्या विकासात सर्वांनी मोलाचे योगदान द्यावे,” अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक संजय घाडी, दीक्षा कारकर, रेखा यादव, आदिती खुरसंगे-पांचाळ, मंगेश पांगारे यांसह अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याला विभाग प्रमुख मनोहर देसाई, महिला विभाग संघटक मीनाताई पानमंद यांच्यासह पक्षाचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जनसंपर्क कार्यालयातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.





