कल्याणात खळबळ: बुद्धभूमी फाउंडेशनच्या वास्तूवर महापालिकेचा बुलडोझर!


मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा

कल्याण पूर्व येथील अशोक नगर, वालधुनी परिसरात असलेल्या ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या बुद्धभूमी फाउंडेशन (Buddha Bhoomi Foundation) संकुलावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) पोलिस बंदोबस्तात मोठी पाडकाम कारवाई केली आहे. विकासकामांच्या नावाखाली थेट तथागत गौतम बुद्धांच्या मूर्ती, स्तूप आणि बौद्ध भिक्खूंच्या निवासस्थानावर बुलडोझर चालवण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या कारवाईच्या निषेधार्थ ज्येष्ठ बौद्ध भिक्खू भन्ते गौतमरत्न महाथेरो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट बुलडोझरसमोर झोपून तीव्र प्रतिकार केला. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी आणि बौद्ध समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तूंची तोडफोड
वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशन ही केवळ एक संस्था नसून, गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून (१९८०-८१ पासून) या परिसरात बौद्ध संस्कृती आणि विचारांच्या प्रसाराचे मुख्य केंद्र आहे. या भव्य बुद्धिस्ट कॉम्प्लेक्समध्ये अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तूंचा समावेश आहे, ज्यामध्ये:

भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र मूर्ती
ऐतिहासिक बौद्ध स्तूप आणि पंचशील प्रतीके
बौद्ध भिक्खूंचे निवासस्थान आणि ध्यान केंद्र
भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृ
तीमैत्रेय बुद्ध विहार आणि ऐतिहासिक धर्मशाळा

या कारवाईदरम्यान महापालिकेने क्रेन आणि जेसीबीच्या साहाय्याने यातील काही बांधकामे पाडली, तीन बुद्ध मूर्ती हटवल्या आणि परिसरातील ४0 ते ५० जुनी झाडे बेकायदेशीरपणे तोडल्याचा आरोप फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे.

भिक्खू संघ रस्त्यावर; कोणतीही नोटीस न देता कारवाईचा आरोप
सदर कारवाई सुरू होताच येथील बौद्ध भिक्खूंनी आणि स्थानिक नागरिकांनी त्याला कडाडून विरोध केला. “महापालिकेने किंवा संबंधित प्रशासनाने कोणतीही कायदेशीर पूर्वसूचना, लेखी आदेश अथवा नोटीस न देता ही अत्यंत गुंडगिरीच्या पद्धतीने कारवाई केली आहे,” असा गंभीर आरोप वरिष्ठ भिक्खू भन्ते गौतमरत्न महाथेरो यांनी केला आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये स्पष्ट दिसत आहे की, पवित्र बुद्ध मूर्ती आणि वास्तूंना वाचवण्यासाठी वृद्ध भिक्खू अंगावर चालून येणाऱ्या बुलडोझर आणि जेसीबी मशीनच्या समोर रस्त्यावर आडवे झोपले होते. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की पोलिसांनी शांततेत चाललेल्या या आंदोलनावर बळाचा वापर केला, भिक्खूंना ओढत बाजूला केले आणि काही ठिकाणी लाठीचार्जही केला, ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

Advertisement

महापालिकेचा दावा: ‘कारवाई कायदेशीर, पूल उभारणीत अडथळा’
या वाढत्या वादानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे (KDMC) आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रशासनाची बाजू मांडली आहे. “वालधुनी (प्रेम ऑटो) ते विठ्ठलवाडी दरम्यान २४ मीटर रुंदीच्या चार पदरी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या विकासकामाच्या मार्गात येणारे अतिक्रमण हटवण्यासाठीच ही कारवाई करण्यात आली आहे. ज्या जमिनीवर पाडकाम झाले, ती जागा अधिकृत भूमी अभिलेखानुसार महापालिकेच्या मालकीची आहे. प्रशासनाने पूर्वसूचना देऊनच ही कारवाई केली असून यात कोणतीही आकस बुद्धी नाही,” असे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले आहे.

आंबेडकरी संघटना आक्रमक; पोलीस ठाण्यावर मोर्चा
महापालिकेचा हा दावा बुद्धभूमी फाउंडेशनने पूर्णपणे फेटाळून लावला आहे. “पुलाच्या कामासाठी नुकसानभरपाई आणि पुनर्वसनाची प्रक्रिया अद्याप कायदेशीर पातळीवर सुरू असताना, अचानक अशी कारवाई करणे बेकायदेशीर आहे,” असे प्रतिपादन ट्रस्टच्या सदस्यांनी केले आहे.

या घटनेच्या निषेधार्थ कल्याणमधील विविध सामाजिक आणि आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत महात्मा फुले पोलीस स्टेशनवर धडक दिली. बौद्ध भिक्खूंशी गैरवर्तन करणाऱ्या आणि धार्मिक भावना दुखावून बेकायदेशीर तोडफोड करणाऱ्या जबाबदार पालिका अधिकारी, आयुक्त आणि दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत (Atrocity Act) गुन्हे दाखल करावेत, अशी आक्रमक मागणी करण्यात आली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण वालधुनी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x