भाजप स्वबळावर लढणार
यंदा राज्याच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशा तीन पक्षांनी एकत्र मिळून लोकसभा निवडणूक लढवली आहे. यामध्ये राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांचे वाटप करताना महायुतीत झालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे भाजपला महाराष्ट्रात मोठा फटका बसला आहे.
मात्र आता भाजपचे २०१४ च्या निवडणुकीप्रमाणे स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत चिंतन सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीत बहुरंगी लढती झाल्या तर त्यात भाजप पक्षाला सर्वाधिक जागा निवडून येतील असा अंदाज भाजपकडून व्यक्त करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ पारचा नारा देणाऱ्या भाजपला अवघ्या ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे भाजपने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विधानसभेच्या १५० हून अधिक मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे. तर महायुती १२८ विधानसभा मतदारसंघात पुढे आहे. महाविकास आघाडीला मराठा, मुस्लिम आणि दलितांची मते मिळाली आहेत. ओबीसी मतांवर अवलंबून असलेल्या महायुतीला या मतांवर १७ जागाच जिंकता आल्या आहेत.
विधानसभेच्या २८८ जागांपैकी प्रत्येकी किमान ८० जागांची मागणी शिंदे गट आणि अजित पवार गट करणार आहे. त्यामुळे त्यांना किमान प्रत्येकी ७० जागा या दोन गटाला दिल्या तर भाजपच्या वाट्याला केवळ १४८ जागा येतात. त्यात १०० चा आकडा पार करणे देखील कठीण आहे. त्यामुळे बहुरंगी लढती झाल्या तर विधानसभेचे चित्र काय असेल ? तसेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत झाली तर महाविकास आघाडीचे पारडे जड होऊ शकते, असे भाजपला वाटत आहे.
भाजपला साथ दिल्यामुळे अजित पवार गटाकडे दलित आणि मुस्लिम तसेच काही प्रमाणात मराठा मतदारांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे विधानसभेला ही मते पुन्हा महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात. अजित पवार स्वतंत्र लढले तर त्यांच्या हिमतीवर जास्त जागा जिंकू शकतात, असा भाजपचा अंदाज आहे. दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत गद्दार म्हणून महाविकास आघाडी कडून प्रचार केला जाईल, त्याला कसे तोंड द्यायचे असा प्रश्न सतावत आहे.





