पोर्शे प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया
पुण्यात झालेल्या अपघात प्रकरणामधे आतापर्यंत दहा जणांना अटक झाली आहे. त्यात अल्पवयीन मुलाचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांचा समावेश आहे. आता त्या मुलाची आई शिवाणी अग्रवाल हिला शनिवारी अटक झाली. या प्रकरणात रोज अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांचंही नाव अडचणीत सापडलं आहे. त्यामुळे अशात अजित पवार यांच्या भूमिकेसंदर्भातही अनेक सवाल केले गेले. अपघात झाला त्या रात्री आमदार टिंगरे पोलिस स्टेशनमध्ये गेले होते. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केला होता का?, असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
यावर आता स्वतः अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज माध्यमांसोबत संवाद साधताना अजित पवारांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. राज्यात सर्वत्र त्या भागातील आमदार एखादी घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यात जात असतात. तो त्या ठिकाणी जाऊन पोलिसांना योग्य चौकशी करण्याचा सूचना देतो. त्यानुसार आमदार सुनील टिंगरे गेले होते. त्यांनी कोणताही दबाव आणला नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.
आता हे प्रकरण जनतेचं झालं आहे. या प्रकरणात पारदर्शकपणे चौकशी करा. कोणाच्या दबावास बळी पडू नका, इतक्याच सूचना आम्ही अधिकाऱ्यांना करत आहोत, असं अजित पवार म्हणाले. तसंच अपघातानंतर पोलीस आयुक्तांना आपण फोन केला नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात फोन केला असता तरी जखमींना मदत तातडीने द्या आणि आरोपींवर कारवाई करा अशाच सूचना आम्ही देत असतो, असं अजित पवार म्हणाले आहेत.
यावेळी अजित पवार यांनी डॉ. अजय तवारे यांच्या शिफारस पत्राबाबतही भाष्य केलं. बदलीची शिफारस आम्ही करतो. परंतु ते नियमात आहे की नाही, हे बघण्याचे काम अधिकाऱ्यांचे आहे. आमचे शिफारस पत्र असते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी नियम पाहून बदली करायला हवी, असं अजित पवार म्हणाले आहेत.





