माँ जिजाऊ जयंती विशेष..!!
जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे म्हाळसाबाई आणि लखुजी जाधव यांच्या पोटी झाला. लखोजीराजे जाधव हे मराठा कुलीन होते. जिजाबाईंचा विवाह लहान वयातच वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी झाला. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान योद्धा म्हणून उभे केले.

लखुजीराव जाधव हे निजामशाही दरबारातील बलाढ्य, मातब्बर मंडळी पैकी एक होते. एक दिवशी सर्व सरदार, जहागिरदार, मनसबदार आणि वतनदार शाही कदम पोशी करून आपापल्या घरी जावयास निघाले असता. महाद्वार सामोरी भयंकर गर्दी झाली. या गर्दीत खंडागळ नावाच्या सरदाराचा हत्ती अनियंत्रित झाला. आणि लोकांना पायाखाली तुडवू लागला.
अशावेळी लखुजीराव जाधव यांचा मुलगा दत्ताजीने आपल्या सैन्यासह हत्तीला रोखण्यासाठी त्यावर बाणांचा,भाल्यांचा आणि तलवारीचा वार करू लागले. हा सर्व प्रकरण रोखण्यासाठी विठोजी राजे भोसले यांचे दोन्ही मुले संभाजी आणि खेलोजी ( शहाजीराजे यांचे चुलतभाऊ ) दत्ताजी वर तुटून पडले. आणि भोसले – जाधव यांच्यात युद्ध पेटले. आणि संभाजी ने दत्ताजीला ठार केले. ही बातमी पुढे पोहचलेल्या लखुजीराव जाधव यांना कळताच ते सूड घेण्यासाठी भोसल्यांवर चालून आले. आणि संभाजी वर प्रहार केला. आपल्या चुलतभावावर वार केला म्हणून शहाजीराजे भोसले देखील या लढाईत उतरले परंतु लखुजीराव जाधवांचा आक्रोश सामोरी त्यांचा टिकाव लागला नाही. लखुजीराव यांच्या तलवारीच्या प्रहाराने शहाजी महाराज गंभीर जखमी झाले. आणि त्यांनी अखेरीस संभाजीला ठार केला.
या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले. नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.
जिजाबाईंना एकूण सहा (६) अपत्ये होती. त्यापैकी ४ दगावली (मतभेद आहेत) व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.
जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.
शिवाजी महाराज १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जिजाऊ यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवरायांना तत्कालीन वारकरी पंथाच्या, परिसरातील वेगवेगळ्या ऐतिहासिक आणि सामाजिक परंपरांचा अभ्यास करविला. वारकरी संतांच्या प्रबोधनाची छाप शिवरायांवर पडली. त्यांचा समतेचा, बंधुभावआणि न्यायाचा उपदेश शिवाजी महाराजांच्या पुढील काळात झालेल्या वाटचालीत आपल्याला दिसून येतो. जिजाऊ देखिल अत्यंत समता आणि न्यायाच्या पुरस्करत्या होत्या. संत तुकाराम महाराज हे तत्कालीन वारकरी संत. तुकोबांच्या विवेकी आणि विद्रोही शिकवणुकीचा आणि जिजाबाईंनी दिलेल्या संस्कारांचा शिवाजी राज्यांवर मोठा प्रभाव राहिला. जिजाबाईंनी नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत.
जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. हे सर्व गुण त्यांनी त्यांचा शिवरायांना दिले. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या. त्यांचा मोठा मुलगा संभाजीचा मृत्यू अफझलखानाने केला होता. त्याचा सूड घेण्यासाठी त्यांनी शिवरायांना प्रोत्साहन दिले, जे त्यांनी पूर्ण केले.
पुणे येथील आपल्या पतीची जहागीर त्यांनी समर्थपणे चालवून त्याचा विकास केला. त्यांनी कसबापेठ गणपती मंदिराची स्थापना केली. तसेच केवरेश्वर मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार केला. शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पार पाडली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.
शिवरायांच्या पहिल्या पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांचे जुलमाने धर्मपरिवर्तन झाले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.
राजांच्या सर्व स्वाऱ्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना स्वराज्याच्या सीमा वाढवत रांगणा किल्ला जिंकून घेतला. जिजाबाईंनी पूर्णतः जबाबदारी उतारवयातही कौशल्याने निभावून नेली.
१७ जून १६७४ रोजी किल्ले रायगडाजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले. तेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अवघे बारा दिवस झाले होते.
“निर्भीड समाचार” तर्फे माँ जिजाऊ यांना त्रिवार वंदन..!!




