कांदिवलीतील M.L.R.T. Gala Pioneer शाळा प्रकरणी BMC आयुक्त अश्विनी भिडे ॲक्शन मोडमध्ये


मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा

कांदिवली पूर्व येथील ‘M.L.R.T. Gala Pioneer English School’ मधील नियमबाह्य व बेकायदेशीर कारभार, आरटीई (RTE) कायद्याचे उघड उल्लंघन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा होत असलेला गंभीर खेळ आता थेट मुंबई महानगरपालिकेच्या सर्वोच्च रडारवर आला आहे. ‘निर्भीड समाचार’ने पुराव्यांसह चव्हाट्यावर आणलेल्या या संपूर्ण प्रकरणाची मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी अत्यंत गंभीर दखल घेतली आहे.

आयुक्त कार्यालयाने कोणतीही दिरंगाई न करता, अवघ्या ५० मिनिटांच्या आत या प्रकरणाची फाईल अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (Additional Municipal Commissioner) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांच्याकडे वर्ग करून तातडीने उच्चस्तरीय कायदेशीर चौकशी करण्याचे कडक निर्देश जारी केले आहेत. महापालिका आयुक्तांच्या या थेट धडक हस्तक्षेपामुळे लाचखोर आणि निष्काळजी प्रवृत्तीच्या अधिकारी वर्गात आणि नियमबाह्य कारभार करणाऱ्या शाळा व्यवस्थापनाला चाप बसण्याची शक्यता आहे.

मंत्रालयाचे आदेश पायदळी तुडवणाऱ्या निसार खान यांची चौकशी होणार!
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने (मंत्रालय) ६ मार्च २०२६ रोजीच या शाळेविरुद्ध दाखल तक्रारीचे ७ दिवसांच्या आत निराकरण करण्याचे स्पष्ट आणि कडक आदेश कनिष्ठ प्रशासनाला दिले होते. मात्र, मुंबई महानगरपालिकेचे उपशिक्षणाधिकारी (खाजगी प्राथमिक शाळा) श्री. निसार खान यांनी कोणतीही प्रत्यक्ष कायदेशीर पाहणी (Site Inspection) न करता, केवळ शाळा प्रशासनाचा एकतर्फी आणि संशयास्पद खुलासा ग्राह्य धरून ही अत्यंत गंभीर तक्रार बेकायदेशीरपणे आणि नियमबाह्य रीतीने निकाली काढली होती.

तक्रारदार तथा सजग पत्रकार किसन राम गायकवाड यांनी उपशिक्षणाधिकारी निसार खान यांच्या अधिकृत व्हॉट्सॲप नंबरवर शाळेच्या इमारतीचा धोकादायक स्लॅब आणि बेकायदेशीर वेळेचे सर्व ठोस डिजिटल व तांत्रिक पुरावे १५ दिवसांपूर्वीच पाठवले होते. तरीही खान यांनी जाणीवपूर्वक कोणतीही दंडात्मक कारवाई केली नाही. शासकीय आदेशाची उघड अवहेलना करून दोषी शाळेला पाठीशी घालणाऱ्या या जबाबदार अधिकाऱ्याची आता थेट अतिरिक्त आयुक्तांमार्फत कसून चौकशी केली जाणार आहे.

Advertisement

कायद्याचे घोर उल्लंघन आणि विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ!
सदर शाळा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत शासन निर्णयाचे (GR दिनांक ०८ फेब्रुवारी २०२४) थेट उल्लंघन करून प्राथमिक वर्ग सकाळी ७:०० वाजता भरवत आहे, ज्यामुळे लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. त्यातच, शाळेच्या इमारतीचा स्लॅब अत्यंत धोकादायक स्थितीत असतानाही त्यावर केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे. या संदर्भात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) देखील मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आणि कडक दंडात्मक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.

दोषींवर निलंबनाची आणि दंडात्मक कारवाईची टांगती तलवार!सजग पत्रकार आणि थेट बाधित पालक म्हणून किसान राम गायकवाड यांनी एकाच वेळी प्रशासकीय आणि न्यायालयीन (ग्राहक मंच – e-Jagriti) पातळीवर या भ्रष्टाचाराची आणि नफेखोरीची पूर्णपणे कोंडी केली आहे. महापालिका आयुक्तांच्या या थेट हस्तक्षेपानंतर आता ‘RTE Act, 2009’ आणि विद्यार्थी सुरक्षा नियमांचा भंग केल्याप्रकरणी संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी उपशिक्षणाधिकारी निसार खान यांना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका आयुक्तांच्या या वेगवान आणि कायदेशीर भूमिकेमुळे आता पीडित पालकांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली असून, ‘निर्भीड समाचार’ या संपूर्ण चौकशी प्रक्रियेवर आणि येणाऱ्या अहवालावर बारीक लक्ष ठेवून आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x