शिवाजी पार्कवर ‘ठाकरे’ ऐक्य! विद्यार्थ्यांच्या लढ्यासाठी आदित्य-अमित एकत्र


मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा

दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायकारक लाठीचार्जच्या आणि नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ मुंबईत संतापाची लाट उसळली आहे. या अन्यायाविरोधात मुंबईतील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आंदोलन करण्यासाठी एकत्र आलेल्या शेकडो तरुणांची आज शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे आणि मनविसे (MNS) अध्यक्ष अमित ठाकरे यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. भरपावसात सुरू असलेल्या या आंदोलनात दोन्ही युवा नेत्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना जाहीर पाठिंबा दिला. “तरुणांचा हा संघर्ष आम्ही वाया जाऊ देणार नाही; या न्याय्य लढ्यात आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” अशी ग्वाही यावेळी दोन्ही नेत्यांनी दिली.

देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ परीक्षा घोटाळा आणि दिल्लीतील विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ मुंबईत विविध विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत शिवाजी पार्क येथे शांततापूर्ण निदर्शने सुरू केली होती. मात्र, पोलिसांनी मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचे सांगत जवळपास २०० हून अधिक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. विद्यार्थ्यांच्या या अटकेची माहिती मिळताच संपूर्ण राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाची माहिती मिळताच युवा नेते आदित्य ठाकरे आणि मनसेचे अमित ठाकरे यांनी तातडीने दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील आंदोलनस्थळाला भेट दिली. वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीचे असूनही, विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या प्रश्नावर हे दोन्ही नेते एकाच वेळी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी पावसात भिजतच विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांच्या हक्कासाठी एकत्र लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

शिवाजी पार्कवरून पोलिसांनी ज्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले होते, त्यांच्या मदतीसाठी दोन्ही नेते थेट स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. पोलिसांनी विद्यार्थ्यांना तातडीने मुक्त करावे, अशी आक्रमक भूमिका दोन्ही नेत्यांनी घेतली. त्यांच्या या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बहुतांश तरुणांची सुटका केली.

Advertisement

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे अत्यंत आक्रमक मूडमध्ये दिसले. ते म्हणाले, “देशाचा तरुण आज रस्त्यावर उतरून आपल्या भविष्यासाठी आणि न्याय्य हक्कांसाठी लढत आहे. दिल्लीत ज्या क्रूरतेने विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला, तो लोकशाहीचा खून आहे. आम्ही महाराष्ट्रातील आणि देशातील तरुणांचा हा संघर्ष वाया जाऊ देणार नाही. तुमचे सळसळते रक्त थंड होऊ देऊ नका, आम्ही शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनीही सरकारच्या दडपशाहीवर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला. अमित ठाकरे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मांडणे हा त्यांचा घटनादत्त अधिकार आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल करणे किंवा त्यांना ताब्यात घेणे अत्यंत चुकीचे आहे. मनसे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक न्याय्य लढ्यात पूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत राहील आणि त्यांना कोणताही अन्याय सहन करावा लागू देणार नाही.

या आंदोलनाला पुढील दिशा देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी येत्या २४ जुलै रोजी (शुक्रवार) सायंकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथे कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याशिवाय, केवळ भारताच्या तिरंग्याखाली एकत्र येण्याचे आवाहन मुंबईकरांना आणि तरुणांना केले आहे. सायंकाळी ठीक ५ वाजता सर्वजण एकत्र येऊन राष्ट्रगीत गाणार असून हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.दोन प्रमुख तरुण नेत्यांच्या या एकत्र येण्यामुळे मुंबईतील विद्यार्थी चळवळीला मोठी ताकद मिळाली असून, आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x