मराठी अभिनेत्री मयुरी कापडणेचा खळबळजनक खुलासा!
मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा
मराठी अभिनेत्री मयुरी कापडणेला पहिल्या चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शकाकडून मानसिक छळाचा सामना करावा लागला होता, याचा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका खळबळजनक मुलाखतीत केला आहे. ‘माझा होशील ना’, ‘घाडगे अँड सून’ आणि ‘उदे गं अंबे उदे’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली मयुरी सध्या तिच्या एका मुलाखतीमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. ‘इट्स मज्जा’ (Itsmajja) या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील ‘रोल कॅमेरा गप्पा’ पॉडकास्ट शोमध्ये बोलताना तिने तिच्या सुरुवातीच्या काळातील संघर्षावर आणि चित्रपटसृष्टीच्या काळ्या बाजूवर उघडपणे भाष्य केले
एकाच दिवसात कास्टिंग आणि दडपण
मयुरी कापडणेने ‘डोम’ (Dome) या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटाच्या आठवणी सांगताना ती म्हणाली, “या सिनेमासाठी माझं एकाच दिवसात कास्टिंग झालं आणि माझी निवड झाली. त्यावेळी मी या क्षेत्रात पूर्णपणे नवखी होते, मला अभिनयाचा कोणताही पूर्वअनुभव नव्हता. मी कोणतेही वर्कशॉप किंवा एकांकिका केल्या नव्हत्या, फक्त यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून स्वतःच शिकत होते. त्यामुळे पहिल्यांदा चित्रपटाच्या सेटवर गेल्यावर माझ्यावर खूप मोठे दडपण होते.
दिग्दर्शकाकडून झालेला मानसिक छळ
मयुरीने पुढे सांगितले की, ती नवखी आहे हे समजल्यावर चित्रपटाच्या दिग्दर्शकाने याचा गैरफायदा घेत तिला प्रचंड मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तिने एका अत्यंत भीतीदायक प्रसंगाचा उल्लेख केला. मयुरी म्हणाली, “एकदा दिग्दर्शकाने मला स्क्रिप्ट रीडिंगसाठी बोलावले आणि लेडीज डब्यातून एकटीने येण्यास सांगितले. मी सोबत माझा भाऊ असल्याचे सांगितल्यावर, त्यांनी ‘भावाला कशाला आणायचं, एकटीनेच यायचं ना’ असे म्हटले. मी जेव्हा दिलेल्या लोकेशनवर पोहोचले, तेव्हा तिथे कोणीच नव्हते. मी खूप घाबरले होते. त्यानंतर दिग्दर्शक तिथे आला, त्याने फक्त एक पान वाचून घेतले आणि मला जाण्यास सांगितले.
या प्रसंगानंतर मयुरी पूर्णपणे हादरून गेली होती. ती जेव्हा मुंबईहून पुण्याला घरी परतली, तेव्हा या प्रकाराबद्दल कुटुंबियांना काय सांगावे, हेच तिला सुचत नव्हते. त्यातच दिग्दर्शकाने तिला फोन करून ‘तुला चित्रपटातून रिप्लेस करतोय’ अशी धमकी दिली, ज्यामुळे तिची भीती आणखी वाढली.
कायदेशीर कारवाईची धमकी आणि ट्रॉमा
काही दिवसांनी चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू झाले, तेव्हा मयुरीने हा सर्व प्रकार सेटवरील इतर सह-कलाकारांच्या कानावर घातला. त्या सह-कलाकारांनी मयुरीला धीर दिला आणि या परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत केली. याच काळात मयुरीला ‘माझा होशील ना’ ही तिची पहिली मालिका मिळाली. मात्र, मालिका मिळाल्यानंतर चित्रपटाच्या टीमकडून तिला पुन्हा त्रास दिला जाऊ लागला.
“तू दुसरी मालिका स्वीकारल्यामुळे आमच्या चित्रपटाचे शूटिंग रखडले आहे, आम्ही तुझ्यावर कायदेशीर केस करू आणि तुला नुकसान भरपाई द्यावी लागेल,” अशा धमक्या तिला दिल्या गेल्या. या छळाला कंटाळून अखेर मयुरीने ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ’ कडे धाव घेतली आणि पुण्यातील काही ओळखीच्या ज्येष्ठ कलाकारांना हा प्रकार सांगितला. त्यांनी हा निव्वळ मानसिक छळ असल्याचे सांगत तक्रार करण्याचा सल्ला दिला. मयुरीने अधिक वाद न घालता कसेबसे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले, परंतु या मानसिक त्रासामुळे ती तीव्र मानसिक धक्क्यामध्ये (ट्रॉमा) होती. याच कारणामुळे ती नंतर चित्रपटाच्या डबिंग आणि प्रमोशनला देखील उपस्थित राहिली नव्हती.
मालिकांच्या सेटवरील इतर संघर्ष
या मुलाखतीत मयुरीने केवळ चित्रपटाचाच नव्हे, तर मालिकांच्या सेटवर आलेले इतर वाईट अनुभवही शेअर केले. ‘घाडगे अँड सून’ या लोकप्रिय मालिकेत काम करत असताना ज्येष्ठ कलाकारांकडून तिचे सीन्स कापले जायचे आणि तिथेही तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला गेला, ज्यामुळे तिने वर्षभरातच ती मालिका सोडली.
तसेच, ‘उदे गं अंबे उदे’ या स्टार प्रवाहवरील पौराणिक मालिकेच्या शूटिंगदरम्यान तिच्यासोबत एक जीवघेणा अपघात घडला होता. एका आऊटडोअर शूटिंगदरम्यान दोन मजले उंचीचा सिरामिक आणि रॉडचा भलामोठा खांब चालू सीनमध्ये थेट तिच्या अंगावर पडला होता. या अपघातात ती थोडक्यात वाचली, मात्र तिचा अर्धा चेहरा मातीत गेला होता आणि ती गंभीर जखमी झाली होती.
मयुरी कापडणेने ग्लॅमर जगतामागील हे गडद वास्तव समोर आणल्याने सध्या मराठी मनोरंजन विश्वात दिग्दर्शकांच्या वर्तणुकीवर आणि नवख्या कलाकारांच्या सुरक्षिततेवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. नवोदित अभिनेत्री म्हणून तिने सहन केलेला हा संघर्ष पाहून तिचे चाहते आणि नेटकरी तिच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.





