मृत म्हटलेली शिवानी जिवंत; बुलढाणा पोलीस हादरले!


मुंबई/बुलढाणा : निर्भीड समाचार वृत्तसेवा

एखाद्या सस्पेन्स आणि क्राईम वेब सीरिजच्या कथानकालाही मागे टाकेल अशी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात समोर आली आहे. ज्या तरुणीचा खून केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तिच्या सख्ख्या बाप आणि भावाला अटक केली होती, ज्यांनी स्वतः गुन्ह्याची कबुली देऊन तुरुंगाची हवा खाल्ली, तीच तरुणी अचानक जिवंत होऊन थेट पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आहे! ‘शिवानी’ असे या तरुणीचे नाव असून ती पोलिसांसमोर उभी राहताच तपासाची पाठ थोपटणाऱ्या बुलढाणा पोलिसांचे पाय गळाले असून संपूर्ण पोलीस प्रशासन पुरते हादरून गेले आहे.या धक्कादायक प्रकारामुळे आता संपूर्ण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात एकच खळबळ उडाली आहे. तसेच, शिवानी जिवंत असेल, तर मग पोलिसांनी जप्त केलेले ते ‘शीर नसलेले’ धड नेमके कोणाचे होते? असा अत्यंत गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे.

नेमकी काय आहे घटना?
अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील खारिया टेंभ्रू येथील मूळ रहिवासी असलेल्या २५ वर्षीय शिवानी बापूराम कलमेकर (कलमीकर) हिचा विवाह मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील खडकी गावात झाला होता. मात्र, विवाहानंतर अवघ्या काही दिवसांतच, म्हणजेच २४ एप्रिल रोजी शिवानी ही अरुण नावाच्या एका तरुणासोबत अचानक बेपत्ता झाली. तिच्या सासरच्या आणि माहेरच्या लोकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेही मिळून आली नाही. अखेर १ मे रोजी तिच्या कुटुंबीयांनी मध्य प्रदेशातील खकनार पोलीस ठाण्यात ती बेपत्ता (मिसिंग) असल्याची रीतसर तक्रार दाखल केली.

नदीकाठी आढळला छिन्नविच्छिन्न मृतदेह
दरम्यान, २५ एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या रसलपूरजवळील राजुरा शिवारात नदीकाठी एका अज्ञात महिलेचा मृतदेह अत्यंत छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. मारेकऱ्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्या महिलेचे शीर (डोके) धडावेगळे केले होते आणि धड अर्धवट जळलेल्या अवस्थेत फेकून दिले होते. मृतदेहाजवळ एक गुलाबी रंगाची चप्पल, स्कार्फ आणि काळ्या मण्यांची पोत (मंगळसूत्र) सापडली होती. या भयानक दृश्यामुळे संपूर्ण जळगाव जामोद परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली.

पोलिसांचा ‘फास्ट ट्रॅक’ तपास आणि कथित ‘ऑनर किलिंग’चा दावा
स्थानिक गुन्हे शाखेने आणि जळगाव जामोद पोलिसांनी या खुनाचा तपास करताना मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर भागात बेपत्ता असलेल्या महिलांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना शिवानी बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने शिवानीचे वडील बापूराम नथ्थू कलमेकर आणि भाऊ अजय कलमेकर यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चौकशी दरम्यान बाप आणि लेकाने ‘ऑनर किलिंग’ची कबुली दिली.

Advertisement

शिवानीचे लग्न झाले असतानाही तिचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते आणि ती त्याच्यासोबत पळून गेल्याने कौटुंबिक प्रतिष्ठेला धक्का बसला, याच रागातून आम्ही तिचा गळा चिरून खून केला आणि प्रेत राजुरा शिवारात जाळले, असा धक्कादायक कबुलीजबाब या दोघांनी पोलिसांना दिला. या कबुलीजबाबाच्या आधारे पोलिसांनी कोणतीही वैज्ञानिक खातरजमा किंवा डीएनए (DNA) चाचणी न करताच, ती मृतदेह शिवानीचीच असल्याचा अंतिम निष्कर्ष काढला. पोलिसांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन या क्लिष्ट मर्डर मिस्ट्रीचा छडा लावल्याचा मोठा दावा केला आणि दोन्ही आरोपींना थेट बुलढाणा मध्यवर्ती कारागृहात (तुरुंगात) डांबले.

ट्विस्ट: ‘मृत’ शिवानी थेट पोलीस ठाण्यात हजर!
बाप आणि भाऊ तुरुंगाची हवा खात असतानाच, या संपूर्ण प्रकरणाला गुरुवारी असा काही नाट्यमय मोड मिळाला की पोलिसांची मतीच गुंग झाली. ज्या मुलीचा खून झाला म्हणून पोलीस केस बंद करण्याच्या तयारीत होते, तीच २५ वर्षीय शिवानी कलमेकर अचानक चालत बुऱ्हाणपूर आणि नंतर जळगाव जामोद पोलीस ठाण्यात जिवंत उभी राहिली!तिला जिवंत समोर पाहून पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला. शिवानीने पोलिसांना सांगितले, “मी जिवंत आहे, मी माझ्या मर्जीने अरुणसोबत निघून गेले होते. माझे वडील आणि भाऊ पूर्णपणे निर्दोष आहेत, पोलिसांनी त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकले आहे, त्यांची तात्काळ सुटका करा”. शिवानीच्या या जबाबाने पोलीस ठाण्यात जणू भूकंपच आला.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
शिवानी जिवंत परतल्यामुळे आता बुलढाणा पोलिसांच्या तपासाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या संपूर्ण ढिसाळ कारभारामुळे खालील गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत:

१. डीएनए टेस्ट का केली नाही?: मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारी डीएनए चाचणी आणि फॉरेन्सिक अहवाल येण्याआधीच पोलिसांनी इतकी घाई का केली?

२. मारहाण करून कबुली घेतली का?: जर शिवानी जिवंत आहे, तर तिच्या निर्दोष बाप आणि भावाने “आम्हीच तिचा खून केला” अशी कबुली का दिली? पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर करून त्यांच्याकडून हा खोटा गुन्हा वदवून घेतला का?

३. निष्पापांच्या बदनामीला जबाबदार कोण?: ज्या निष्पाप बाप-लेकाला विनाकारण तुरुंगवास भोगावा लागला आणि समाजात त्यांची जी बदनामी झाली, त्याची भरपाई कोण करणार?

मग ‘ती’ मृत महिला नेमकी कोण?
शिवानी जिवंत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता जळगाव जामोद पोलिसांसमोर एक नवीन आणि अत्यंत मोठे आव्हान उभे राहिले आहे. जर ती शिवानी नाही, तर २५ एप्रिल रोजी राजुरा शिवारात सापडलेला तो छिन्नविच्छिन्न आणि शीर नसलेला मृतदेह नेमका कोणाचा आहे? त्या दुर्दैवी महिलेची हत्या कोणी आणि का केली? या नव्या रहस्यमय प्रश्नाने पोलिसांची झोप उडवली आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x