शाळा : बालसंस्काराचे विद्यापीठ
मुलं आईच्या उदरात असताना शिक्षण घेत असते. जन्म झाल्यावर बालपणी आपले आईबाबा पहिले गुरू आहेत असे आपण नेहमीच म्हणतो. लहान बालक आपल्या मातृभाषेत प्रथम बोलायला शिकते. हळूहळू वस्तूचे ज्ञान होते. अडीच ते तीन वर्षापर्यंत मुले बोलू लागतात. लहान मुलं तर प्रश्न विचारून भंडावून सोडतात सूर्य एकच का? इकडेच का उगवतो ? चांदोबा मामा आपल्या गावी व मुंबईला एकच असतो का ? तो गावापासून आपल्या पाठी पाठी असून आपले रक्षण करतो का? कसे प्रश्न लहान बालक विचारत असतात. आजकाल आई -बाबा मुळाक्षरे अंकगणित घरीच शिकवतात चॉकलेट देतो बोल A for apple ,B for boy , क कढईचा ख खडूचा , इ.
उभा माणूस एकाचा , गाईचे शिंगे चाराचे अशाप्रकारे अंकगणिताची व भाषेची ओळख कुटुंबातच होतेआणि घरात आजी ,आजोबा असले तर विविध गोष्टी सांगत राहतात भारतीय संस्कार ,संस्कृती व मूल्ये जपायला घरातच शिकवतात . यात आजी -आजोबा मामा, आत्या, बहिण, भाऊ, मावशी बालपणीचे संस्कार घडविण्यात यांचा हातखंडा असतो. पुस्तकातील गोष्टी गप्पा बडबड गीते थोड्याफार प्रमाणात घरीच बाळकडू मिळते.
जेव्हा आईचा किंवा बाबाचा हात धरून शाळेचा रस्ता गाठला जातो तेव्हा कावरेबावरे मुलं होतात , रडतात पडतात घाबरतात , काही गांगरून जातात. घरापेक्षा शाळेच्या भिंती, दरवाजे, खिडक्या, प्रशस्त पाहून गोंधळतात काही पठ्ठे सदैव हसतमुख व आनंदी असतात. आईबाबा सोडून नवीन बाई , सर त्यांना भेटतात. दिवसभर वह्या पेन्सिल, पाटी, खोडरबर, शार्पनर, पुस्तक रूमाल, खाऊचा डबा हे सांभाळता – सांभाळता नवीन मित्र – मैत्रीण यात मग्न व हळूहळू दंग होतात. मग शाळा हवी हवीशी वाटते.
शाळेत गाणे, खेळ, गप्पा, गोष्टी, नाचून गाऊन बाई व सर शिकवत असतात. दिवसभर मेंदू मध्ये शाळेतील घटनांचा क्रम ठसा मेंदूवर अलगद उमटत जात राहतो. घरी गेल्यावर घरात पाय की दारात पाय मुलं बोलायला लागत , आई – आई माझं ऐक ना गं…तू ऐकतच नाही गडे…
आई म्हणते ये ते बूट काढ अगोदर . “ती चप्पल काढ प्रथम ” आई, आई आमच्या बाई आहे नं बाई काय मस्त शिकवतात, तुझ्या पेक्षा छान.
अरे ! तो बूट असा फेकतात का ? ते सॉक्स उचल अगोदर , त्या दरवाजा मागे फेकले ते….
आई आमचे सर व आमच्या बाई छानस …गीत म्हणत होते… आनंदाची शाळा मुलांनो आपण लाऊया लळा.. आनंदाची शाळा…
आमचे सर ,मधल्या सुट्टी नंतर गाणे गाऊन हिरोसारखे नाचून – गाऊन शिकवत होते. “हा देश माझा याचे भान , जरासे राहू द्या रे … जरासे राहू द्या…” आई देश म्हणजे काय गं?
अरे गधड्या मधल्या सुट्टीत खेळलास जंतू झाले असतील हातावर …अरे! साबनाणे हात- पाय -धूवून घे नंतर बोल …
माझी सर्व पालकांना विनंती आहे. मुलं शाळेतून घरी आल्यावर ते काय म्हणतात ते कृपया ऐका, कान देऊन, ते तुमच्याशी वय वर्षे 6 ते 14 वयापर्यंत बोलणार तर त्याचे म्हणणे ऐका त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्या. नेहमीच काम – काम करत बसू नका. आयुष्य भर काम आहेच पण ठराविक वयात मुलांना बोलणे, त्यांना वेळ देणे. गप्पा गोष्टी सांगणे, त्यांचे मत ऐकणे हे आपले आद्य कर्तव्य हवे. एकदा ते निरागस, हिरमुस, झाले तर त्याला खंत नको वाटायला मम्मी, पप्पा ऐकत नाहीत. त्यांच्याशी बोला खेळा, हसवा, त्यांच्या आवडी – निवडी ओळखा. काहीही सबब सांगू नका.
दिवसेंदिवस बाळ छोटा शिशू – मोठा शिशू , बालवर्ग , पहिली , दुसरी, तिसरी, चौथी असा टप्पा गाठत कधी दहावीत येते कळतच नाही. दिवस भरकन निघून जातात. त्याच्या राहणीमानात बोलण्यात, वागण्यात बदल पडतो. कालांतराने मित्र -दोस्त, मैत्रिणी हे आपलेसे वाटतात जास्त वेळ त्यांच्यात जावा असे वाटते. शाळेत आल्यावर
गणवेश, बूट, टाय, कमरपट्टा, रूमाल, याने एक शिस्त अंगी जडते. सगळेच आपल्या सारखे विद्यार्थी एक संघ एकजुटीची भावना मनात रूजते. सकाळी सकाळी शाळेची घंटा झाल्यावर तालासुरात , लयबद्ध शिस्तबद्ध , मधूर आवाजात
*१)*देशभक्ती रूजवणरे गीत**
राष्ट्रगीत …
जनगणमन – अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता |
राज्यगीत ..गर्जा महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…
“भारताचे संविधान ”
‘उद्देशिका’आम्ही , भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस :
प्रतिज्ञा :- भारत माझा देश आहे . सारे भारतीय माझे बांधव आहेत.
राष्ट्रीय गीत :- वंदे मातरम् ….
भारतातील प्रत्येक राज्यात ,केंद्र शासित प्रदेशात सर्व प्रकारच्या शाळेत राष्ट्रगीत , भारताचे संविधान , “उद्देशिका ” प्रतिज्ञा , राष्ट्रीय गीत हिंदी ,इंग्रजी व त्या त्या राज्याची मातृभाषेतून हे गायले जाते.
२) *भाषाविषयातून*संस्कार…
कथा , कहाण्या , गोष्टी, दाखले, पुरावे , पुराणातील गोष्टी , गद्य , पद्य , परदेशी कहाण्या , नाटके , प्रसंग , अनूभव ,प्रवासवर्णने निसर्गाच्या सानिध्यात , वर्णने , नद्या , डोंगर पर्वत , शेती , झाडे, फुले , वेली पशू , पक्षी , प्राणी , हे सर्व भाषा विषयात कळते. आकाश वर्णने ,पत्रलेखन , उतारे , कहाणी पूर्ण करणे . यातून संस्कार बालमनावर शाळेतच घडतात . नाटक ,स्थूलवाचन , संवाद ,रसग्रहण, म्हणी वाक्यप्रचार , वाक्यात उपयोग करणे , सर्व प्रकारचे व्याकरण हा भाषा विषयाचा गाभा होय . कोणत्याही भाषेने बालमनावर कायमस्वरूपी संस्कार जडतात.
३)*सांस्कृतिक कार्यक्रम**
सांस्कृतिक कार्यक्रम तर बहरदार संधी आहे .इयत्ता बालवर्ग ते बारावी पर्यंत या वयात शाळेत मुले घडतात .गायन ,वादन ,नृत्य, भाषण, संभाषण, वक्तृत्व, नेतृत्व एकपात्री अभिनय, कला, चित्रकला, हस्तकला, मातीकाम, नक्षीकाम, सृजनशीलता, कार्यानुभव मधून विविध, पुस्तक बांधणी, नक्षिकाम, विणकाम, कला, संगीत, संगणक, डीजीटल युगाचे ज्ञान, समूह गीत गायन, समूह नृत्य, देशभक्तीपर गीते, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्र गीत, राज्यगीत, राष्ट्रीय गीत, प्रतिज्ञा,” संविधान प्रास्ताविक उद्देशिका ” देशाबद्दल आदर बाळगणे. थोर राष्ट्र पुरूष, महापुरुष, स्वातंत्र्य सैनिक, यांच्या विषयी आत्मियता त्यांच्या शौर्याची यशोगाथा पठन, मनन, चिंतन, करून आपण त्यांच्या सारखे होण्याची पर्यायाने बनण्याची जिद्द, चिकाटी, हातोटी , अंगी बाळगणे, राष्ट्र .
४) **शालेय कार्यक्रम*
राष्ट्र पुरूषाची जयंती, पुण्यतिथी, या कार्यक्रमातून प्रेरणा, उत्साह, मनोबल मिळते, प्रभातफेरी, देशावर घोषणा,
‘भारतमाता की जय ‘ वंदे मातरम् , हम सारे भारतीय एक है | ही भावना कुमारवयीन वयातच मनात जडते मुलं -मुली यात फरक करता आपण सारे बहिण -भाऊ. ही एकसंघ भावना वाढत जाते. व हे विचार वृंद्धिगत होतात. आपला राष्ट्र ध्वज तिरंगा, राष्ट्रीय सण, पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन, कामगार दिवस, एक मे ,, सहशालेय कार्यक्रम, शाळेचे स्नेहसंमेलन, त्याच्यातील सहभाग, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो.
५) **क्रिडांगण*
शाळेच्या क्रिडामहोत्सव मध्ये भाग घेण्याची एक प्रकारची पर्वणी मिळते , चिकाटी, चपळाई, चढाई, पकड ने शरीर पिळदार होते. संघाची भावना एकसंघ राहण्याचे फायदे कळतात. कवायत, इन डोअर खेळ, आऊट डोअर खेळ. बुद्धी बळाचे खेळ व वैयक्तिक , सांघिक खेळाने आरोग्याचे महत्त्व कळते . हे शारिरीक शिक्षण, आरोग्य शिक्षण या तासाला वेगवेगळ्या प्रकारे सराव होतो. कवायत, जिमनास्टीक खेळ व कबड्डी ,खोखो ,क्रिकेट , लंगडी , हॉलीबॉल ,बास्केटबॉल , फूटबॉल , टेबलटेनिस , धावणे ,शंभर मीटर व चारसे मीटर , याने वर्दीतील ,देशसेवा करण्यासाठी नोक-यांची हमी व सैन्यात भरती होण्याची आकांक्षा बालवयातच मनात उत्पन्न होते.
६)**शाळेतील विषय*
विज्ञान, भूगोल, इतिहास, सारख्या विषयातून, जंगल, डोंगर, नदी, पर्वत, शेती, पर्यावरण, याची प्रचिती येते. तर शरीर रचना, अवकाश, अंतराळ, जैविक तंत्रज्ञान प्राणी, वनस्पती, शेवाळ, कवके, वेली, फुले, निसर्ग, निसर्गाच्या सानिध्यात विहंगम दृश्य, रसायने, रंग, रूप, ऋतू , उन्हाळा, पावसाळा, हिवाळा इ. गावाचा जिल्ह्याचा, राज्याचा, राष्ट्राचा इतिहास कळतो, स्वातंत्र्य सैनिक, राजे महाराजे यांचे स्वभाव गुण कर्तृत्व नेतृत्व, जबाबदारी समजते प्राचीन, अर्वाचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारताचा, जगाचा इतिहास समजतो. आकडेमोड, तर्क, सुसंगत मांडणी, स्मरणशक्तीची वृंद्धी होते, शास्त्रज्ञ याची माहिती जाणीव बालमनाला होते.
७) **सामाजिक बांधिलकी*
मोठ्यांना आदरयुक्त बोलण्याची सवय आईवडीलांची सेवा शुश्रूंषा. हे, विश्वचे माझे घर अशी व्यापक संकल्पना शक्यतोवर शाळेतच रूजते. याचे पाठ हे बालपणात शालेय वातावरणात मिळतात. चांगल्या सवयी, वैयक्तिक स्वच्छता, हे सर्व शाळा जबाबदारीने घेते, शाळेतील विविध कार्यक्रमा अंतर्गत कळतनकळत बालसंस्कार घडत असतात व गुरूने दिलेला ज्ञानरुपी वारसा पुढे चालविण्याची हमी प्रत्येक शाळकरी मुलं देत असते.
यदाकदाचित एखादा विद्यार्थी पुढे भविष्यात चोर, लुटारू, ठग, धोकेबाज, फसवेगिरी करणारा, व्यसनी चारित्र्यहिन निघाला तर जगातील कोणतीही शाळा असे दुर्गुणी संस्कार मुलावर करत नाही. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीने तो मानवाचा हैवान बनतो. शाळा ही संस्कृती. संस्कार व जगण्याचे मूल्ये शाश्वत शिकवते, म्हणूनच शाळा : बालसंस्काराचे विद्यापीठ आहे .
सुदाम रामभाऊ कटारे
गणित शिक्षक
नूतन विद्यामंदिर हायस्कूल
कुरार व्हिलेज, मालाड पूर्व, मुंबई – ४०००९७
मोबाईल :- ८९२८५१७४५७






