अभिनेते किरण मानेंचा राज ठाकरेंवर घणाघात
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान काल राज्यात पार पडलं. त्यामुळे राजकीय नेते आता पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी सभा घेण्यास सज्ज झाले आहेत. अशातच महाराष्ट्रात राज ठाकरे आणि महाविकास आघाडी यांच्यातील वाद पाहावयास मिळत आहे. राज ठाकरे यांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिला असून बऱ्याच ठिकाणी त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा देखील घेतल्या आहेत.
अशातच राज ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ आता विरोधकांकडून व्हायरल केला जात आहे. भाजप नेते ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा आरोप ठेवण्यात आला आहे. या आरोपांनंतर भाजपने उत्तर प्रदेशातील कैसरगंज मतदारसंघातून ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा करण भूषण यांना उमेदवारी दिली आहे.
अशात विरोधकांनी राज ठाकरे यांचा एक जुना मुद्दा प्रकाशात आणला आहे. “महिला कुस्तीगीरांनी ज्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत त्या ब्रिजभूषणवर कारवाई करा.”, अशा आशयाचे पत्र राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं असल्याचं त्यांनीच जाहीर केलं होतं. मात्र, या पत्राबाबतची सत्यता आता समोर आली आहे. अभिनेते तथा ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी फेसबुक वर एक पोस्ट करत याबाबत मोठा खुलासा केला आहे.
राज ठाकरे यांनी पत्र पाठवलच नसल्याचं किरण माने यांचे म्हणणे आहे. इतकंच नाही तर, ही सगळी त्यांची स्टंटबाजी असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. याबाबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील टिका केली आहे. अशातच किरण माने यांची फेसबुक पोस्ट देखील आता चर्चेत आली आहे.
“महिला कुस्तीगीरांनी ज्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत त्या ब्रिजभूषणवर कारवाई करा.” अशा आशयाचे पत्र राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांना पाठवले आहे असे राज ठाकरेंनी जाहीर केले होते. एक वर्षापूर्वी ३१ मे रोजी सोशल मिडीयावर ते पत्र पोस्ट केले गेले. ते पत्र प्रचंड व्हायरल झाले होते. “ब्रिजभूषणला आम्ही मुंबईत पाऊल ठेवू देणार नाही.” असा इशाराही त्यांनी दिला होता.
हा स्टंट असणार असा संशय काही जणांना आला. ईडीच्या भितीने घाबरलेले राजजी हे धाडस करणार नाहीत अशी बर्याच जणांना खात्री होती. शेवटी माहितीच्या अधिकारात एकाने याविषयी अर्ज करून विचारणा केली होती. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाकडून असे उत्तर आले की, “राज ठाकरे यांच्याकडून असे कुठलेही पत्र पंतप्रधान कार्यालयाला आलेले नाही.”
सुषमा अंधारे ताईंनी काल अणुशक्तीनगर येथे हा पर्दाफाश केला तेव्हा मी तिथे हजर होतो. उपस्थित प्रचंड जनसमुदायातून शेम…शेम असा खुप मोठा आवाज ऐकू येऊ लागला होता. लोकांना मनापासून या फसवणुकीचे वाईट वाटलेले दिसले.
राजकीय नेत्यांनी कायम एक लक्षात ठेवावे. एकवेळ तुम्ही निष्क्रिय राहा, जनता खपवून घेईल… पण खोट्या भूलथापा देऊन जनतेच्या भावनांशी खेळू नका. आधीच या देशातले सर्वसामान्य नोकरदार, छोटे व्यावसायिक, गोरगरीब मजूर, शेतकरी, कष्टकरी आणि महिला यांचं जगणं हराम झालं आहे, त्यात तुम्ही असे थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका, बस. अशा आशयाची पोस्ट किरण माने यांनी केली आहे.





