‘जन गण मन’ आधी आता ‘वंदे मातरम्’ अनिवार्य; नियम मोडल्यास मोठी शिक्षा!
मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा
भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांचा आणि राष्ट्रगीताचा मान राखण्यासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आतापर्यंत देशात राष्ट्रध्वज (तिरंगा), भारतीय संविधान आणि राष्ट्रगान ‘जन गण मन’ यांच्या अवमानाला फौजदारी गुन्ह्याच्या कक्षेत ठेवण्यात आले होते. मात्र, आता या यादीमध्ये भारताचे राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ चा देखील समावेश करण्यात आला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये, म्हणजेच २९ जुलै रोजी राज्यसभेत आणि ३० जुलै रोजी लोकसभेत हे दुरुस्ती विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले होते, ज्याला आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायद्याचे स्वरूप मिळाले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वामांनुसार (MHA Guidelines) राष्ट्रीय कार्यक्रमांच्या प्रोटोकॉलमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत:
१. क्रमामाध्ये बदल (वंदे मातरम् आधी): कोणत्याही अधिकृत सरकारी कार्यक्रमात, नागरी पुरस्कार सोहळ्यात किंवा सार्वजनिक समारंभात जेव्हा राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान दोन्ही सादर केले जातील, तेव्हा ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले किंवा वाजवले जाईल. त्यानंतर ‘जन गण मन’ होईल.
२. सावधान मुद्रेत उभे राहणे बंधनकारक: जेव्हा ‘वंदे मातरम्’ वाजवले किंवा गायले जाईल, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक नागरिकाला ‘सावधान’ (Attention) मुद्रेत उभे राहावे लागेल. (चित्रपटगृहात चित्रपट किंवा न्यूजरीलचा भाग म्हणून हे गाणे आल्यास उभे राहणे बंधनकारक नाही).
३. शाळांमध्ये सक्ती: सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये दिवसाची सुरुवात म्हणजेच सकाळची प्रार्थना सभा (Morning Assembly) ‘वंदे मातरम्’ च्या सामूहिक गायनाने करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
४. सर्व ६ अंतरे गायली जाणार: नवीन नियमांनुसार, ‘वंदे मातरम्’ चे सर्व ६ अंतरे (Stanzas) पूर्णपणे गायली किंवा वाजवली जातील, ज्याचा एकूण कालावधी ३ मिनिटे १० सेकंद असेल.
‘राष्ट्रीय सन्मानाच्या अपमानास प्रतिबंध अधिनियम, १९७१’ च्या कलम ३ मध्ये ही नवीन दुरुस्ती करण्यात आली आहे. नव्या कायद्यानुसार:
1. जर कोणतीही व्यक्ती ‘वंदे मातरम्’ सुरू असताना जाणीवपूर्वक गोंधळ घालताना, अडथळा आणताना किंवा त्याचा अपमान करताना आढळली, तर तो अजामीनपात्र गुन्हा मानला जाईल.
2. या गुन्ह्यासाठी दोषी आढळल्यास कमाल ३ वर्षांपर्यंतचा तुरुंगवास, मोठा आर्थिक दंड किंवा दोन्ही शिक्षा सुनावल्या जाऊ शकतात.
3. जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर वारंवार हा गुन्हा केल्यास, त्याला किमान १ वर्षाची सक्तीची जेलवारी भोगावी लागेल.
हा कायदा करताना भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेत दिलेल्या ऐतिहासिक विधानाचा संदर्भ देण्यात आला आहे. त्यांनी स्पष्ट केले होते की, बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावली असून, त्याला राष्ट्रगान ‘जन गण मन’ इतकाच समान दर्जा आणि सन्मान दिला जाईल. तब्बल ७६ वर्षांनंतर या घोषणेला अधिकृतपणे कडक कायद्याचे कवच मिळाले आहे. चालू वर्ष २०२६ मध्ये ‘वंदे मातरम्’ च्या रचनेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारने या ऐतिहासिक कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.





