रोहिणीच्या आत्महत्येनंतर पती निलेशची पहिली भावुक पोस्ट; ‘माझी चिमणे..’
मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील प्रसिद्ध रील स्टार आणि ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या मालकीण रोहिणी निलेश पाराध्ये यांच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. नेहमी कॅमेऱ्यासमोर हसतमुख राहणाऱ्या आणि साध्या अभिनयाने लाखो फॉलोअर्सच्या गळ्यातील ताईत बनलेल्या रोहिणीने अवघ्या २५ व्या वर्षी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या धक्कादायक घटनेनंतर सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले असून, आता तिचे पती निलेश पाराध्ये यांनी सोशल मीडियावर पहिली भावुक पोस्ट शेअर करत आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.
निलेशने आपल्या पत्नीच्या आठवणीत फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर केलेली ही भावनिक पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. एका बाजूला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, दुसऱ्या बाजूला या पोस्टवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत निलेशला अनेक गंभीर प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.
“चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस..” पतीची भावुक पोस्ट
रोहिणीच्या निधनानंतर तिचे पती निलेश पाराध्ये यांनी सोशल मीडियावर त्यांच्या सुखी संसाराचे जुने फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. निलेशने पोस्टमध्ये लिहिले.
“माझी बायको, माझी चिमणे, तुला मला असं सोडून जायचं नव्हतं गं.. आपण मिळून शून्य ते विश्वाचा प्रवास सुरू केला होता. आता कुठे आपले चांगले दिवस यायला सुरुवात झाली होती, सर्व काही सुरळीत होणार होतं. पण तू अर्ध्यावरच आमची साथ सोडलीस. तुझ्याशिवाय माझं आयुष्य पूर्णपणे रिकामं झालं आहे. एकदा तरी परत ये गं..” निलेशने अत्यंत भावुक शब्दांत आपल्या पत्नीच्या अकाली जाण्याचे दुःख मांडले आहे. रोहिणीला तो प्रेमाने ‘चिमणे’ हाक मारायचा, तिची हीच आठवण काढताना त्याच्या शब्दांना अश्रूंचे कोंदण लाभले होते.
हॉटेलच्या स्वयंपाकघरातच संपवलं जीवन
२६ मे रोजी दुपारी अडीचच्या सुमारास रोहिणी पाराध्ये हिने ब्रह्मपुरी येथील स्वतःच्या ‘हॉटेल ग्रामपंचायत’ च्या स्वयंपाकघरात लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ज्यावेळी तिने हे टोकाचे पाऊल उचलले, त्यावेळी पती निलेश हा हॉटेलच्या बाहेरच काउंटरवर बसलेला होता, अशी माहिती समोर आली आहे. काही वेळातच हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिला तातडीने मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.रोहिणीने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केलेला शेवटचा रील व्हिडिओ सुद्धा सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती हॉटेलच्या किचनमध्ये भाकऱ्या थापताना दिसत असून, ती काहीशा वैतागलेल्या स्वरात पती निलेशला काउंटर सोडून स्वयंपाकात मदत करण्याची विनंती करताना पाहायला मिळत आहे.
व्यवसायाचा ताण आणि कौटुंबिक कलह?
पुण्यातून मंगळवेढ्याला आल्यानंतर रोहिणी आणि निलेश या जोडीने मिळून ‘हॉटेल ग्रामपंचायत’ सुरू केले होते. त्यांच्या अस्सल ग्रामीण आणि खाद्यसंस्कृतीच्या रिल्समुळे हा व्यवसाय प्रचंड वेगाने वाढला. त्यांनी अल्पावधीतच हॉटेलच्या आणखी दोन नवीन शाखा सुरू केल्या होत्या.परंतु, पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, नवीन शाखांचे व्यवस्थापन करताना निर्माण झालेली आर्थिक गणिते, व्यवसायातील व्यस्तता आणि वाढता मानसिक तणाव यामुळे पती-पत्नीत सातत्याने अंतर्गत वाद होत होते. याच वाढत्या तणावातून आणि घरगुती वादाला कंटाळून रोहिणीने हे भयानक पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
पतीच्या भावुक पोस्टवर नेटकरी मात्र संतापले!
पती निलेशने अत्यंत हळवी पोस्ट शेअर केली असली, तरी नेटकऱ्यांनी मात्र कमेंट बॉक्समध्ये त्याच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. रोहिणी जेव्हा हॉटेलच्या स्वयंपाकघरात एकटीच दिवसभर राबायची आणि गळफास घेत होती, तेव्हा पती बाहेर काय करत होता? असा थेट सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.”ती तुझी पत्नी होती, हॉटेलची मोलकरीण नाही. रिल्सच्या नादात तिने स्वतःचे आयुष्य संपवले, तिच्यावर कामाचा आणि शाखांचा एवढा मानसिक दबाव का आणला?” अशा संतप्त कमेंट्स करत नेटकऱ्यांनी निलेशला धारेवर धरले आहे.
पोलिसांचा तपास वेगाने सुरू: मागवले मोबाईलचे CDR
मंगळवेढा पोलिसांनी सध्या या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. पोलिसांनी निलेश पाराध्ये आणि त्याच्या आई-वडिलांसह कुटुंबातील इतर सदस्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. मृत्यूचे नेमके कारण उघड करण्यासाठी पोलिसांनी रोहिणी आणि तिचा पती निलेश या दोघांच्याही मोबाईलचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) मागवले आहेत. या तांत्रिक पुराव्यांनंतर आणि रोहिणीच्या माहेरच्या लोकांचे जबाब नोंदवल्यानंतर या आत्महत्येमागील नेमके सत्य लवकरच बाहेर येईल.





