पोर्शे कार अपघात प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंचा धाडसी निर्णय
पुणे हिट अँड रन प्रकरण राज्यात चांगलंच गाजत आहे. कारण या प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणामुळे अग्रवाल कुटुंबातील तीन पिढ्या सध्या तुरुंगात आहेत. या प्रकरणी आरोपी वेदांत अग्रवालसह त्याचे वडील आणि आजोबांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणात बड्या बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी प्रशासनाने देखील मदत केल्याचा आरोप आहे. प्रशासनाने सर्व नियम धाब्यावर बसवत अनेक गोष्टी गुपित ठेवल्या. मात्र या प्रकरणाचा सखोल तपास करता सर्व खुलासे झाले आहेत. या घटनेत पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टर्सना देखील अटक करण्यात आली आहे. कारण डॉक्टरांनी आरोपीचे रक्ताचे नमुने बदलवले होते. त्यावेळी डॉक्टरांनी आरोपीचे रक्ताचे नमुने चक्क कचऱ्याच्या डब्ब्यात फेकले होते. याप्रकरणी डॉक्टरांना देखील पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेत आरोपीने दारु प्राशन केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे पब पार्टीमध्ये आरोपी वेदांत दारु पित असल्याचे फोटो सुद्धा समोर आले होते. तसेच ब्लड सॅम्पलमुळे आरोपी घटनेच्यावेळी दारुच्या नशेत होता की नाही? हे समजणार होतं. मात्र त्यामुळे चक्क ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला आहे. अशातच आता या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी महत्वपूर्ण चर्चा केली आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुणे हिट एंड रन प्रकरणांमध्ये आरोपींची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात सामील असलेल्या शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले आहेत.
तसेच या प्रकरणात गुन्हेगाराचे कलम वाढवता येईल का? यावर देखील वरिष्ट पातळीवर विचार सुरू असल्याचे सांगितले आहे. या सर्व घटनेमध्ये बिल्डर,आमदार, खासदार, मंत्री अगदी कोणाचाही सहभाग असल्यास या प्रकरणात त्यांना देखील आरोपी करा. कारण समाजामध्ये या प्रकरणाच्या माध्यमातून चांगला संदेश जायला हवा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत.





