राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जयंती दिनविशेष..!!
राष्ट्र संत गाडगे बाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी शेंडगाव ता.दर्यापूर, जि.अमरावती येथे झाला. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव – झिंगराजी राणोजी जाणोरकर, तर आईचे नाव – सखुबाई झिंगराजी जाणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडील दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.

दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले. त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.

गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |” असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. “देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका.” अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
कर्मयोगी गाडगेबाबांनी या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम केले ती एक महान तत्त्वज्ञानी, द्रष्टे, समाज सुधारक, प्रबोधनकार होते. गाडगेबाबांनी सहभोजनाच्या माध्यमातून त्या काळात ‘जातीय सलोखा’ निर्माण करण्याचे फार मोठे काम केले. शेतकऱ्यांना सावकार कर्जापाई पीडित होते याकरिता ‘शेतकऱ्यांच्या मुक्तीच्या आंदोलन’ गाडगेबाबांनी त्या वेळी सुरू केले होते आणि बऱ्याच शेतकऱ्यांना या पासून मुक्त केलं होते. ज्या काही वाईट चालीरिती परंपरा रूढी व त्या यांचे निर्दालन करून त्या बंद कराव्या असं ते नेहमी आवाहन करायचे. स्पृश्य-अस्पृश्य भेद मिटून जावा, सर्व माणसे समान आहेत, ही त्यांची शिकवण होती. शोषणाविरुद्ध त्यांनी मोठा लढा उभा केला होता. ‘दगडात देव नाही तर देव माणसात आहे’ जिवंत माणसात, प्राणिमात्रात देव आहे, हे सांगणारे संत गाडगेबाबा होते. भूतदया, प्राणीमात्रांवर दया केली पाहिजे, याकरीता त्यांनी फार मोठे कार्य केले. बोकडबळी प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यासोबतच बैलांवर अत्याचार होतात म्हणून शंकरपट बंद करावे, हे सुद्धा त्यांनी सांगितले होते. शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा याकीता विविध शिक्षण संकुले काढली. शिक्षण संस्थांना मदत केली. यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची ‘रयत शिक्षण संस्था’ यांना मदत करण्यास पासून ते विदर्भातील डॉ. पंजाबराव देशमुख यांची ‘शिवाजी शिक्षण संस्था’ असो, यांच्या कामाचं सतत कौतुक केले. आपल्या कृतीतून त्यांनी अस्पृश्यतेवर प्रहार केले. अंधश्रद्धा निर्मूलन हे अतिशय महत्त्वाचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं. जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे आणि त्या माध्यमातून जनतेने आपलं जीवन व्यतीत केले पाहिजे, यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. हुंडा प्रथेवर सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात कठोर टीका केली. हुंडा प्रथा बंद व्हावी, याकरिता प्रयत्न केले. ते माणसांच्या मनांची मशागत करत. स्त्रियांच्या सन्मानासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात काम केले. किर्तनात आपल्या दशसूत्रीतून त्यांनी ‘भुकेल्यांना – अन्न, तहानलेल्यांना – पाणी, उघड्या नागड्यांना – वस्त्र, बेघरांना – निवारा, गरीब मुला-मुलींना – शिक्षण, रोग्यांना – औषध, बेरोजगारांना – रोजगार, मुक्या प्राण्यांना – अभय, दुखी व निराशितांना – हिंमत, तरुण गरीब तरुण-तरुणींचे लग्न लावून दिले.
लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावतीजवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे. अमरावती विद्यापीठाला “संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ” असे नाव दिले आहे.




