सोने एक्सचेंज करताय? सावधान, आयकराचा बसेल फटका!
मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा
गेल्या वर्षभरात सोन्याच्या दराने प्रति दहा ग्रॅम एक लाखाचा टप्पा ओलांडल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. लग्नसराई किंवा सणासुदीसाठी नवीन सोने खरेदी करणे मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. यावर तोडगा म्हणून सध्या बाजारात एक नवा कल (Trend) पाहायला मिळत आहे. अनेक लोक घरातील जुने सोन्याचे दागिने सराफाकडे देऊन त्याबदल्यात नवीन डिझाईनचे दागिने खरेदी करत आहेत.परंतु, जर तुम्हीही असा विचार करत असाल, तर वेळीच सावध व्हा. जुने सोने बदलून नवीन दागिने घेणे तुम्हाला महागात पडू शकते. तुम्ही फक्त डिझाईन बदलत असलात, तरी हा व्यवहार आयकर विभागाच्या (Income Tax Department) रडारवर येऊ शकतो आणि तुम्हाला मोठा कर भरावा लागू शकतो.
‘एक्सचेंज’ नव्हे, तो ठरतो ‘नफा’
सर्वसामान्यांना वाटते की आपण दुकानात सोने विकून पैसे घेतलेले नाहीत, केवळ सोन्याच्या बदल्यात सोने घेतले आहे; त्यामुळे यावर कोणताही कर लागणार नाही. पण आयकर कायद्यानुसार हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे.आयकर नियमांनुसार, जेव्हा तुम्ही जुने सोने सराफाला देता, तेव्हा तो ‘भांडवली मालमत्तेची विक्री’ (Sale of Capital Asset) मानली जाते. त्या बदल्यात तुम्ही नवीन दागिने घेतले तरी जुन्या सोन्याच्या विक्रीतून तुम्हाला मिळालेला नफा हा ‘कॅपिटल गेन्स’ (Capital Gains) अंतर्गत करपात्र ठरतो.
कराचे गणित कसे ठरते?
सोन्यावरील भांडवली कराची रचना ते सोने तुम्ही किती काळ जवळ बाळगले आहे यावर ठरते:
१. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (STCG): जर तुम्ही खरेदी केलेले सोने ३ वर्षे (३६ महिने) पूर्ण होण्यापूर्वीच बदलले किंवा विकले, तर त्यातून मिळणारा नफा तुमच्या एकूण उत्पन्नात जोडला जातो. तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार (उदा. १०%, २०% किंवा ३०%) यावर कर आकारला जातो.
२. लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG): जर सोने ३ वर्षांपेक्षा जास्त काळ तुमच्याकडे असेल आणि त्यानंतर तुम्ही ते बदलले, तर त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन मानले जाते. या नफ्यावर सपाट २० टक्के दराने (सेससह) कर भरावा लागतो. गेल्या वर्षभरात सोन्याचे भाव प्रचंड वाढल्यामुळे जुन्या सोन्याची किंमत आणि आजची किंमत यात मोठा फरक आहे, ज्यामुळे हा कराचा बोजा मोठा असू शकतो.
प्रामाणिक ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
आयकर विभागाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी आणि कायदेशीर कचाट्यात न अडकण्यासाठी ग्राहकांनी खालील गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे:
1. पक्के बिल अनिवार्य: जुने सोने बदलताना सराफाकडून जुन्या सोन्याच्या खरेदीचे मूळ बिल आणि नवीन घेतलेल्या दागिन्यांचे पक्के जीएसटी (GST) बिल आवर्जून घ्या.
2. दराची पारदर्शकता: जुने सोने ज्या दिवशी बदलले, त्या दिवशीचा सोन्याचा अचूक भाव बिलावर नोंदवलेला असावा.
3. आयटीआरमध्ये नोंद: सोन्याच्या एक्सचेंजमधून जर कोणताही मोठा नफा झाला असेल, तर आर्थिक वर्षाचा आयकर परतावा (ITR) भरताना त्याची माहिती कायदेशीररित्या घोषित करा.
सोन्याचा वारसा आणि स्त्रोत
भारतात अनेकदा पिढ्यानपिढ्या चालत आलेले सोन्याचे दागिने बदलले जातात. अशा वेळी या सोन्याचा स्त्रोत (Source) सिद्ध करणे कठीण होते. आयकर विभागाची चौकशी लागल्यास, हे सोने पूर्वजांकडून मिळालेले आहे (स्त्रीधन किंवा वारसाहक्क) हे सिद्ध करावे लागते. प्राप्तिकर कायद्यानुसार, विहित मर्यादेपेक्षा (विवाहित महिला: ५०० ग्रॅम, अविवाहित महिला: २५० ग्रॅम, पुरुष: १०० ग्रॅम) जास्त सोने घरात आढळल्यास त्याचा वैध स्त्रोत दाखवणे बंधनकारक आहे.त्यामुळे सोन्याचे गगनाला भिडलेले भाव पाहून जुने दागिने मोडून नवीन डिझाईन बनवण्याची घाई करू नका. असा कोणताही व्यवहार करताना कायदेशीर आर्थिक सल्लागाराचा किंवा सीएचा (CA) सल्ला नक्की घ्या, जेणेकरून भविष्यातील आर्थिक भुर्दंड टाळता येईल.





