दिल्लीत ‘मोदी चालीसा’ आणि पोस्टरची आरती; सोशल मीडियावर तीव्र संताप


मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा

देशाची राजधानी दिल्ली येथील प्रेस क्लब ऑफ इंडियामध्ये आयोजित एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमामुळे सध्या देशभरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळळ उडाली आहे. ‘नमः भारत’ या संस्थेच्या वतीने दिल्लीत थेट ‘मोदी चालीसा’ पठणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान स्टेजवर भगवान श्रीरामाच्या रूपातील, पाठीवर भाता आणि हातात धनुष्यबाण घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य पोस्टरची रीतसर आरती करण्यात आली, तसेच ‘जय जय मोदी, हर हर मोदी’ अशा घोषणा देण्यात आल्या. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, “आता देव आणि धर्माचा अपमान होत नाही का?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. 

**धार्मिक प्रतीकांचा राजकीय वापर; नेटकरी आक्रमक**
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चाहत्यांनी आणि भक्तांनी यापूर्वीही अनेकदा त्यांचे कौतुक केले आहे, मात्र थेट देवाच्या रूपात त्यांचे पोस्टर लावून त्याची आरती करणे अनेक हिंदू धर्मीय आणि सामान्य नागरिकांना रुचलेले नाही. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या कार्यक्रमावर अत्यंत कडक शब्दांत आक्षेप घेतला आहे. “हिंदू धर्मात भगवान श्रीराम हे कोट्यवधी लोकांचे आराध्य दैवत आहेत. त्यांची तुलना किंवा त्यांचे रूप कोणत्याही जिवंत व्यक्तीला, मग ते देशाचे पंतप्रधान का असेनात, देणे हा थेट हिंदू धर्माचा आणि प्रभू श्रीरामांचा अपमान आहे,” अशी भूमिका अनेक युजर्सनी मांडली आहे. “अशा कृत्यांमुळे धर्माच्या पवित्रतेला बाधा पोहोचत नाही का आणि इतर वेळी धर्माचा अभिमान बाळगणारे अंधभक्त आता गप्प का आहेत?” असा टोकदार प्रश्नही विचारला जात आहे. 

Advertisement

**’मोदी चालीसा’ आणि ‘हर हर मोदी’ घोषणांवरून वाद**
कार्यक्रमात हनुमान चालीसा किंवा दुर्गा चालीसाच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या ‘मोदी चालीसा’चे सामूहिक पठण करण्यात आले. एका जिवंत व्यक्तीच्या नावाने ‘चालीसा’ लिहिणे आणि त्याचे पठण करणे हा हिंदू संस्कृतीतील देवत्वाच्या संकल्पनेचा गैरवापर असल्याचा आरोप अध्यात्मिक क्षेत्रातील काही व्यक्तींकडून केला जात आहे. यापूर्वी २०१४ च्या निवडणुकीत ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ या घोषणेवर शंकराचार्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता, कारण ‘हर हर’ हा पुकार केवळ भगवान शंकरांसाठी केला जातो. आता पुन्हा एकदा ‘हर हर मोदी’च्या घोषणा दिल्या गेल्याने धार्मिक भावना दुखावल्याची भावना व्यक्त होत आहे. 

**विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका**
या संपूर्ण प्रकरणावरून राजकीय वादही पेटला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी या घटनेचे फोटो शेअर करत सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या विचारसरणीवर निशाणा साधला आहे. “ज्या देशाला संविधानाने लोकशाही दिली, तिथे एका व्यक्तीची व्यक्तीपूजा (Personality Cult) कोणत्या थराला गेली आहे, हे यावरून दिसून येते. स्वतःला धर्माचे रक्षक म्हणवणारे लोक आज एका नेत्याला देवाच्या जागी बसवून आरती करत आहेत, ही अत्यंत लाजीरवाणी आणि चिंतेची बाब आहे,” अशी टीका विरोधकांनी केली आहे. हा कार्यक्रम अधिकृतपणे भाजपचा नसला, तरी पक्षाच्या समर्थकांकडून अशा गोष्टींना प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप होत आहे. 

**सोशल मीडियावर ‘व्यक्तीपूजा विरुद्ध धर्म’ अशी चर्चा**
फेसबुक, एक्स (ट्विटर) आणि इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करत हजारो लोकांनी संताप व्यक्त केला आहे. काही कट्टर समर्थकांनी या कृतीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला असला, तरी बहुतांश नेटकऱ्यांनी याला ‘अतिरेकी व्यक्तीपूजा’ म्हटले आहे. “एखाद्या नेत्यावर तुमचे प्रेम असू शकते, पण त्यांना थेट विष्णूचा अवतार किंवा प्रभू श्रीरामांच्या रूपात दाखवणे हा हिंदू धर्मशास्त्राचा अपमान आहे,” असा सूर सामान्य लोकांमध्ये उमटत आहे. या वादामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण आणि सोशल मीडियावरील चर्चा सध्या प्रचंड तापली आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x