गोकुळ नगर कांदिवलीत पाण्याचा अपव्यय; पालिकेचे दुर्लक्ष


मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा

मुंबईत एकीकडे पाणी बचतीचे आवाहन केले जात असताना, दुसरीकडे मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कांदिवली पूर्व येथील गोकुळ नगर, वार्ड क्रमांक ३९ (कार्ड क्रमांक ३९) मधील साईबाबा मंदिराच्या जवळ असलेल्या पाण्याच्या मुख्य वाल (Valve) मधून गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

भर वस्तीत पाण्याचा पूर; नागरिक त्रस्त
गोकुळ नगर हा कांदिवली पूर्वेतील अत्यंत गजबजलेला परिसर आहे. येथील साईबाबा मंदिराच्या अगदी जवळच पालिकेची मुख्य पाण्याची वाहिनी आणि पाण्याचा मुख्य वाल आहे. गेल्या काही काळापासून या वालमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने किंवा तो योग्य प्रकारे बंद न केल्यामुळे, पाणी पुरवठा सुरू होताच या ठिकाणाहून कारंज्यासारखे पाणी बाहेर फेकले जाते.

हे पाणी थेट रस्त्यावर आणि आजूबाजूच्या परिसरात साचत आहे. यामुळे साईबाबा मंदिराकडे येणाऱ्या भाविकांना आणि स्थानिक पादचाऱ्यांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे खड्डे पडू लागले असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती स्थानिक महिलांनी व्यक्त केली आहे.

महापालिका प्रशासनाची ‘ ‘दिरंगाई” आणि उदासीनता
या पाण्याच्या अपव्ययाबाबत स्थानिक रहिवाशांनी ‘आर-दक्षिण’ (R-South) विभागाच्या पाणी पुरवठा विभागाकडे तोंडी स्वरूपात अनेकदा तक्रारी दाखल केल्या आहेत. परंतु, “लवकरच दुरुस्ती करू” असे पोकळ आश्वासन देण्यापलीकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. पाणी गळती रोखण्यासाठी पालिकेकडे पुरेशी यंत्रणा असतानाही, एका वालची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासन एवढा वेळ का लावत आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

Advertisement

स्थानिक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
निवडणुका जवळ आल्या की मतांचा जोगवा मागणारे स्थानिक नेते आणि लोकप्रतिनिधी आता कुठे गायब झाले आहेत? असा सवाल गोकुळ नगरमधील जनता करत आहे. “आम्ही कर भरतो, मग आम्हाला मूलभूत सुविधांसाठी आणि हक्काच्या पाण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या दारात फेऱ्या का माराव्या लागतात?” असा थेट प्रश्न येथील सुजाण नागरिकांनी उपस्थित केला आहे.

एकिकडे टंचाई, दुसरीकडे पाण्याचा अपव्यय
मुंबईच्या अनेक भागांत आजही कमी दाबाने पाणी पुरवठा होतो, तर काही झोपडपट्ट्यांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागते. असे असताना गोकुळ नगरमध्ये मात्र रोज हजारो गॅलन शुद्ध, पिण्याचे पाणी रस्त्यावरून वाहून गटारात जात आहे. पालिकेचे ‘पाणी वाचवा’ हे अभियान केवळ कागदावरच मर्यादित आहे का? की पालिका केवळ सर्वसामान्यांनाच पाणी वाया घालवल्यास दंड ठोकणार, आणि स्वतःच्या निष्काळजीपणावर पांघरूण घालणार? अशी टीका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
प्रशासकीय पातळीवर आणि राजकीय पातळीवर कुठेही दाद मिळत नसल्यामुळे आता गोकुळ नगरमधील रहिवाशांच्या संयमाचा बांध सुटत चालला आहे. जर येत्या दोन ते तीन दिवसांत पालिकेने या पाण्याच्या वालची दुरुस्ती करून ही पाणी गळती थांबवली नाही, तर आर-दक्षिण वॉर्ड ऑफिसवर हंडा मोर्चा काढण्यात येईल आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गोकुळ नगरमधील महिला मंडळ आणि स्थानिक तरुणांनी दिला आहे. आता तरी पालिका प्रशासन झोपेतून जागे होऊन या समस्येची दखनील घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x