८ महिने चेहऱ्यावर पट्टी का होती? अभिनेत्री महिमा म्हात्रेचा खुलासा!
मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा
महिमा म्हात्रेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, साधारण ८ महिन्यांपूर्वी ‘तुला जपणार आहे’ मालिकेच्या सेटवर एक महत्त्वाचा अॅक्शन सीक्वेन्स शूट केला जात होता. मालिकेतील कथेनुसार, ‘मीरा’ ही ‘अथर्व’चा जीव वाचवण्यासाठी घोड्यावर स्वार होऊन त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते, असा तो सीन होता. या आव्हानात्मक आणि भव्य सीनसाठी सेटवरील सर्वच कलाकार आणि तंत्रज्ञ खूप उत्सुक होते. एका मोठ्या मैदानात हे शूटिंग सुरू होते.
सुरुवातीचे दोन-तीन शॉट्स अतिशय उत्तम प्रकारे शूट झाले. मात्र, शेवटचा फायनल शॉट घेत असताना अचानक घात झाला. तो घोडा अचानक अस्वस्थ झाला आणि खूप वेगाने धावू लागला. महिमाने लगाम खेचून घोड्याला नियंत्रित करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तो उधळला आणि नियंत्रणाबाहेर गेला. काही वेळातच महिमा घोड्यावरून खाली कोसळली.
घोड्यावरून पडल्यानंतर सुरुवातीला सेटवरील कोणालाच दुखापत किती गंभीर आहे याचा अंदाज आला नाही. पण संपूर्ण सेटवर अचानक शांतता पसरली आणि महिमाच्या नाकातून रक्ताची धार वाहू लागली. दुखापत खूप मोठी झाल्याचे लक्षात येताच तिला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.या प्रसंगाची आठवण सांगताना महिमा अत्यंत भावुक झाली होती. ती म्हणाली, “हॉस्पिटलमध्ये जाताना मला माझे संपूर्ण आयुष्य डोळ्यांसमोर दिसत होते. माझे कुटुंबीयही तिथे पोहोचले होते.” डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिच्या नाकाला आणि कपाळाला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. तिला दोन ते तीन दिवस हॉस्पिटलमध्येच अॅडमिट राहावे लागले होते आणि डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता.
महिमा म्हात्रेने दाखवलेली कामाप्रतीची निष्ठा थक्क करणारी आहे. इतका मोठा अपघात होऊन आणि डॉक्टरांनी विश्रांती सांगितलेली असतानाही, केवळ ७ ते ८ दिवसांत ती पुन्हा सेटवर हजर झाली आणि चित्रीकरणाला सुरुवात केली. मालिकेचे नुकसान होऊ नये म्हणून तिने चेहऱ्यावर बँडेज पट्टी लावूनच सीन्स शूट करण्याचा निर्णय घेतला.गेले ८ महिने तिची वैद्यकीय ट्रीटमेंट आणि औषधोपचार सुरू होते. अपघातामुळे तिच्या नाकावर आणि कपाळावर एक खोल जखम झाली होती, ज्याचा चेहऱ्यावर मोठा व्रण (डाग) तयार झाला होता. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, तो डाग जास्त गडद होऊ नये आणि त्यावर थेट सूर्यप्रकाश पडू नये, म्हणून काळजीपोटी ती सतत नाकावर पट्टी लावत होती. जर ती पट्टी काढली असती, तर इन्फेक्शन होऊन तिची त्वचा आणि चेहरा अधिक बिघडण्याची शक्यता होती.
८ महिन्यांच्या दीर्घ काळानंतर डॉक्टरांच्या परवानगीने महिमाने शेवटी ती पट्टी चेहऱ्यावरून हटवली आहे. तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली असून आता ती आगामी भागांमध्ये कोणत्याही पट्टीशिवाय पूर्वीसारखीच स्क्रीनवर दिसेल.या कठीण काळात तिला मानसिक आणि भावनिक आधार देणाऱ्या सर्वांचे तिने मनापासून आभार मानले. महिमा म्हणाली, “हे दिवस माझ्यासाठी सोपे नव्हते. पण ‘तुला जपणार आहे’च्या प्रोडक्शन हाऊसने मला खूप पाठिंबा दिला. माझ्या कुटुंबाने आणि माझ्या लाडक्या प्रेक्षकांनी मला दिलेल्या प्रेमामुळेच मी पुन्हा एकदा उभी राहू शकले.” सोशल मीडियावर सध्या महिमाच्या या धाडसाचे आणि कौतुकाचे जोरदार मेसेज येत असून चाहते तिच्या पूर्णपणे बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.





