मालाडमधील Blinkit वर मोठी कारवाई; एफडीएकडून अन्न परवाना निलंबित
मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा
काही मिनिटांत घराघरांमध्ये किराणा आणि अन्नपदार्थ पोहोचवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड’ (Blinkit) या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मला अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठा झटका दिला आहे. मुंबईतील मालाड (पश्चिम) परिसरातील ब्लिंकिटच्या गोदामावर (डार्क स्टोअर) एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली आहे. गोदामात आढळलेली कमालीची अस्वच्छता, कीटक आणि झुरळांचा प्रादुर्भाव यामुळे या गोदामाचा अन्न परवाना (Food License) तत्काळ प्रभावानं निलंबित करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एफडीएने ही कारवाई मालाड पश्चिमेतील रामचंद्र लेन येथील सर्वोदय भवनातील गाळा क्रमांक ए-०३, प्लॉट क्रमांक ३८, ३९ व ४० येथे असलेल्या ब्लिंकिटच्या डार्क स्टोअरवर केली. ७ ऑगस्ट रोजी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या गोदामाची अचानक पाहणी केली असता तिथे अन्न सुरक्षेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे उघडकीस आले.
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी गोदामाची तपासणी केली असता तेथील भयानक अवस्था पाहून अधिकारीही थक्क झाले. कारवाईमागे खालील प्रमुख कारणे समोर आली आहेत:
झुरळे आणि कीटकांचा सुळसुळाट: ग्राहकांना डिलिव्हरी करण्यासाठी ठेवलेल्या ताज्या भाज्या आणि फळांच्या साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जिवंत झुरळे आणि कीटक फिरताना आढळले. यामुळे अन्नपदार्थ दूषित होऊन लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकत होता.
अस्वच्छता आणि गंजलेले रॅक: संपूर्ण गोदाम कमालीचे अस्वच्छ होते. अन्नपदार्थ जमिनीवर आणि गंजलेल्या लोखंडी रॅक्सवर अयोग्य पद्धतीने रचून ठेवण्यात आले होते.
मुदत संपलेला (Expired) माल: गोदामातील कोल्ड स्टोरेजच्या भागात तपासणी केली असता, तिथे मुदत संपलेले (Expired) आणि पॅकेजिंग खराब झालेले, तोडफोड झालेले अन्नपदार्थ ताज्या मालासोबतच साठवून ठेवल्याचे उघड झाले.
नियमांचे उल्लंघन: अन्न साठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या FIFO (First-In, First-Out) आणि FEFO (First-Expired, First-Out) या मानकांचे पालन येथे केले जात नव्हते.
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची माहिती नाही: गोदामात काम करणाऱ्या कामगारांची वैद्यकीय तपासणी (Medical Fitness) केल्याची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नव्हती. तसेच कामगारांकडे हँड ग्लोव्हज, मास्क किंवा डोक्यावर घालायची टोपी यांसारखी वैयक्तिक सुरक्षेची साधने नव्हती.
गोदामात उंदीर आणि कीटक नियंत्रणासाठी (Pest Control) कोणतीही ठोस यंत्रणा नसल्याचे स्पष्ट झाल्याने, एफडीएने ‘अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६’ मधील कलम ३२(३) नुसार या गोदामाचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. परवाना निलंबनाच्या कालावधीत या गोदामातून कोणत्याही प्रकारच्या अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वितरण करण्यास ब्लिंकिटला सक्त मनाई करण्यात आली आहे. जर निलंबन काळातही व्यवसाय सुरू ठेवल्याचे आढळल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने ७ ते ९ ऑगस्टदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, बेकरी उत्पादने आणि हॉटेल्सविरुद्ध विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. या मोहिमे अंतर्गत राज्यातील ९० हून अधिक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची तपासणी करण्यात आली असून, कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त व अयोग्य साठा जप्त करण्यात आला आहे. नामांकित कंपन्यांच्या डार्क स्टोअर्समध्येच अशी अस्वच्छता आढळल्याने आता ऑनलाइन फूड आणि किराणा डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांच्या विश्वासार्हतेवर ग्राहकांकडून मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.





