पतीनेच पत्नीला ५० हजारांत विकले; गुजरात हादरले!


मुंबई/बनासकांठा : निर्भीड समाचार वृत्तसेवा

गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूरमधून पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी आणि माणुसकीला लाजवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्याच कायदेशीर पत्नीला अवघ्या ५० हजार रुपयांसाठी दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे पाऊल उचलल्यानंतर स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी या नराधम पतीने थेट पोलीस ठाणे गाठले आणि पत्नी बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार (Missing Report) नोंदवली. मात्र, पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला, तेव्हा समोर आलेले सत्य पाहून स्वतः पोलीस अधिकारीही चक्रावून गेले. या संपूर्ण प्रकरणात पीडितेवर अत्याचार झाल्याचेही समोर आले असून पोलिसांनी मुख्य आरोपी पतीसह एकूण ७ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

आवडीची नसून ‘वस्तू’ समजून व्यवहार
पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी निकेश पटेल याचे काही काळापूर्वी लग्न झाले होते. मात्र, लग्न झाल्यापासून तो आपल्या पत्नीला पसंत करत नव्हता. ती आपल्याला आवडत नाही म्हणून तिच्यापासून सुटका करून घेण्याचे त्याने ठरवले. परंतु, तिला कायदेशीर घटस्फोट देण्याऐवजी किंवा तिच्या माहेरी सोडण्याआऐवजी त्याने तिला एखादी वस्तू समजून तिचा चक्क सौदा केला. आपल्या या गुन्हेगारी कटामध्ये त्याने त्याच्या काही मित्रांनाही सामील करून घेतले. निकेशने आपल्या पत्नीला एका दुसऱ्या व्यक्तीला विकण्याचे निश्चित केले आणि तिच्या बदल्यात ५० हजार रुपयांची रक्कम वसूल केली.

गुन्हा लपवण्यासाठी रचला ‘बेपत्ता’ असण्याचा डाव
आपल्याच पत्नीला विकल्यानंतर समाजात आणि नातेवाईकांमध्ये संशय येऊ नये, म्हणून आरोपी निकेश पटेल याने अत्यंत हुशारीने एक डाव रचला. त्याने पालनपूर पश्चिम पोलीस ठाणे (Palanpur West Police Station) गाठले. तिथे त्याने आपली पत्नी घरातून अचानक कुठेतरी गायब झाली असून ती सापडत नसल्याची तक्रार नोंदवली. पत्नी बेपत्ता झाल्याचे ऐकून पोलिसांनीही तात्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला. सुरुवातीला हा कौटुंबिक वादातून महिला घर सोडून गेल्याचा किंवा अपहरणाचा प्रकार असावा, असा पोलिसांचा अंदाज होता.

Advertisement

तपासात गुपित उघड, पीडितेची सुटका
पालनपूर पोलिसांच्या पथकाने तांत्रिक माहिती, मोबाईल लोकेशन आणि गुप्तहेरांच्या मदतीने बेपत्ता महिलेचा शोध सुरू केला. अवघ्या काही तासांतच पोलिसांना या महिलेचा सुगावा लागला आणि पोलिसांनी तिला आपल्या ताब्यात घेतले. तिला सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात आणल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिची चौकशी करण्यात आली. जेव्हा या पीडित महिलेने पोलिसांसमोर आपली आपबिती सांगण्यास सुरुवात केली, तेव्हा पोलीस ठाण्यातील अधिकारीही अवाक झाले. तिने सांगितले की, ती स्वतःहून घर सोडून गेलेली नाही, तर तिच्या पतीनेच तिला ५० हजार रुपयांना दुसऱ्या पुरुषांना विकले होते.

मित्रांनी दागिने लुटले आणि पिंजऱ्यात डांबून केला अत्याचार
पीडितेने दिलेल्या जबाबातून या प्रकरणातील क्रूरतेची परिसीमा समोर आली. आरोपी निकेश पटेल याने आपली पत्नी त्याचा मित्र संजय ठाकोर, अशोक ठाकोर आणि सचिन दरबार यांच्या स्वाधीन केली होती. या मित्रांनी पीडित विवाहितेची दुसरीकडे रवानगी केली. एवढेच नाही तर या नराधम मित्रांनी पीडितेच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले आणि ते बाजारात विकून टाकले. यानंतर अत्यंत अमानुष कृत्य करत, या आरोपींनी त्या असहाय्य महिलेला एका पिंजऱ्यासारख्या खोलीत डांबून ठेवले आणि तिच्यावर अत्याचार (रेप) केला. तिला कोणाशीही संपर्क साधू दिला जात नव्हता.

पोलिसांची झटपट कारवाई; मुख्य आरोपीसह ७ जणांना बेड्या
या अत्यंत गंभीर आणि अंगावर काटा आणणाऱ्या गुन्ह्याची माहिती मिळताच पालनपूर पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (PI) आर. के. पटेल आणि त्यांच्या पथकाने तात्काळ चक्रे फिरवली. महिलेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली. अवघ्या काही तासांच्या आत पोलिसांनी मुख्य आरोपी पती निकेश पटेल याच्यासह गुन्ह्यात थेट सहभागी असलेल्या आणि त्याला मदत करणाऱ्या एकूण ७ जणांना अटक केली आहे. या सर्व आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार मानवी तस्करी, सामूहिक बलात्कार, चोरी आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x