सेवा हीच ईश्वरभक्ती! मुंबईत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना मोफत सहाय्य साहित्याचे वाटप!
कांदिवली/मुंबई : निर्भीड समाचार News Desk
समाजातील वंचित आणि गरजू घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक संस्थांचे योगदान मोलाचे असते. याच सामाजिक बांधिलकीतून विकलांग कल्याणकारी संस्था व पुण्याई सेवा संघ सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांसाठी मोफत सहाय्य साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित राहून लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप केले आणि आयोजकांच्या या स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
या उपक्रमांतर्गत शेकडो ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारे व्हीलचेअर, काठ्या, श्रवणयंत्रे व इतर आवश्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले की, “दिव्यांग आणि ज्येष्ठांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. शासन स्तरावरही या घटकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत, परंतु सामाजिक संस्थांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे.”
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सौ. मुक्ताताई नलावडे आणि प्रविण गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला माजी नगरसेविका सुरेखा पाटील, नगरसेविका निशा परुळेकर, युवासेना मुंबई समन्वयक प्रकाश नाटेकर, राजेश मोरे, रुपेश डाऊर, संतोष पाटील, अजित नाविक आणि इतर मान्यवर व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आयोजकांच्या कार्याला शुभेच्छा देत अशा उपक्रमांमुळे गरजूंच्या जीवनात सकारात्मक बदल घडतो, असा विश्वास व्यक्त केला.





