“आझाद मैदानावर संघर्षाची ठिणगी; आशा सेविकांच्या पाठीशी दानवे-पवार खंबीर.!!
मुंबई : निर्भीड समाचार News Desk
महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीने विविध न्याय्य मागण्यांसाठी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला आज मोठे राजकीय बळ मिळाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) युवा नेते आमदार रोहितदादा पवार यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक महिलांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना अंबादास दानवे यांनी सरकारवर कडाडून टीका केली. “कोरोना काळापासून ते आतापर्यंत आरोग्य व्यवस्थेचा भार वाहणाऱ्या या भगिनींना सरकार वाऱ्यावर सोडत आहे. त्यांच्या मानधनाचा प्रश्न गंभीर असून, केवळ आश्वासनांनी पोट भरत नाही. आम्ही विधिमंडळात या अन्यायाचा जाब विचारू,” असा इशारा त्यांनी दिला.
आमदार रोहित पवार यांनी आशा स्वयंसेविकांच्या कष्टाचे कौतुक करत म्हटले की, “ग्रामीण आणि शहरी भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचे काम आशा सेविका करतात. तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या या महिलांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी. त्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडे तात्काळ पाठपुरावा करणे गरजेचे आहे.”
प्रमुख मागण्या:
१. आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा.
२. मानधनात भरीव वाढ करून ते दरमहा ठराविक तारखेला मिळावे.
३. कामाचा अतिरिक्त भार कमी करण्यात यावा.
४. विमा संरक्षण आणि पेन्शन योजना लागू करावी.
या भेटीमुळे आंदोलकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा कृती समितीने घेतला आहे.





